नवीन शक्कल : देसाईगंज पोलिसांनी केली दोघांना अटकदेसाईगंज : दारूची तस्करी करण्यासाठी दारू वाहतुकदार नवनवीन शक्कल लढवित आहेत. ५ आॅक्टोबर रोजी दोन दारू वाहतुकदारांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली. त्यांनी लढविलेली शक्कल बघून देसाईगंज पोलीसही आश्चर्यचकीत झाले. एकाने दारूच्या बॉटल ठेवण्यासाठी मल्टी पॉकेट बनियाण शिवली होती. तर दुसऱ्याने पोट, पाय, मांडीच्या सभोवताल दारू बॉटल बांधून दारूची वाहतूक करीत होते. संजय महादेव कायरकर (३५) रा. कुर्झा ता. ब्रह्मपुरी, नीलेश रामचंद्र शंभरकर (२२) रा. कहाली ता. ब्रह्मपुरी असे आरोपींची नावे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मार्गावरून देसाईगंजकडे अवैध दारू आणत असल्याची विश्वनीय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारावर अर्जुनी मार्गावर सापळा रचण्यात आला. पोलिसांनी दुचाकीस्वारांना हात दाखविला. मात्र सुसाट वेगाने दुचाकीस्वारांनी पळ काढला. पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्यासह पोलिसांनी पाठलाग करून देसाईगंज शहरालगत दोनही दारू वाहतुकदारांना पकडले. दोघांचीही चौकशी केली असता, एका दारू तस्कराने मल्टी पॉकेट बनियाण शिवले होते. या बनियाणीच्या चारही बाजुला जवळपास ४० ते ५० बॉटल सहज ठेवल्या होत्या. दुसऱ्याची अंगझडती घेतली असता, त्याने पोटाच्या सभोवताल, मांडीजवळ व मांडीच्या खाली दोन ठिकाणी दारू बॉटल ठेवल्या होत्या. त्याच्या संपूर्ण शरीरासभोवताल ३० ते ४० दारू बॉटल होत्या. दोन्ही दारूविक्रेत्यांकडून एमएच-३४-क्यू-५८६२, एमएच-३४-जी-९७३६ दुचाकी वाहनासह तब्बल ७८ हजार रूपयांची दारू जप्त करण्यात आली. पुढील पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)जिल्हाभरात दारूचा तुटवडामागील एक महिन्यापासून जिल्हाभरातील पोलिसांनी नाकेबंदी करून दारू विक्रेते व वाहतुकदारांवर धाडी टाकणे सुरू केले आहे. गणपती उत्सवादरम्यान गडचिरोलीसारख्या शहरात दारू मिळत नव्हती. त्यानंतरही पोलिसांनी मोहीम सुरूच ठेवली असल्याने दारूची वाहतूक जवळपास बंद झाली आहे. परिणामी जिल्हाभरात दारूचा तुटवडा निर्माण झाला आहे. पोलिसांच्या मोहिमेमुळे दारू वाहतुकदार दारू पोहोचवून देण्यास तयार होत नाही. बहुतांश दारूविक्रेत्यांकडे दारूच आढळून येत नाही. ज्या विजेत्यांकडे दारू आहे, ते दामदुपटीने दारू विकत आहेत. वाहतुकदारालाही अधिकची किंमत देण्यास तयार आहेत. परिणामी काही दारू वाहतुकदार जोखीम उठवून दारू आणत आहेत. पोलिसांच्या तावडीतून निसटण्यासाठी अशा प्रकारच्या नवीन शकला शोधून काढल्या जात आहेत. मात्र चाणक्ष पोेलीस त्यांना पकडून अटक करीत आहेत.
शरिराला बॉटल बांधून दारूची तस्करी
By admin | Published: October 06, 2016 2:01 AM