महेंद्र रामटेके/ लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी (जि. गडचिरोली) : आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील रवी, कोंढाळा परिसरात दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने आतापर्यंत दोन बळी घेतले. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश वनमंत्री व प्रधान सचिव वने यांनी शुक्रवारी दिल्यानंतर युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू झाली आहे. त्यासाठी शार्प शूटर्सची दोन पथके आरमोरीत दाखल झाली असून, त्यांनी वनकर्मचाऱ्यांसोबत शोधमोहीम सुरू केली आहे.या परिसरात गेल्या एक-दीड महिन्यापासून पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. या नरभक्षक वाघाने आतापर्यंत दोन इसमांना ठार केले आहे. दीड महिन्यापूर्वी मोहफूल वेचण्यासाठी जंगलालगतच्या शेतशिवारात गेलेल्या कोंढाळा येथील लव्हाजी मेश्राम याचा वाघाने बळी घेतला. १३ मे रोजी याच परिसरात शेतकरी वामन मरापे यालाही वाघाने ठार केले. त्यामुळे स्थानिक प्रचंड दहशतीखाली आहेत. आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाने पिंजरे लावून १५ दिवसांचा कालावधी उलटला, तरीही नरभक्षक वाघ जेरबंद झालेला नाही.
नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी शार्प शूटर्स आरमोरीत
By admin | Published: May 29, 2017 4:05 AM