महेंद्र रामटेकेलाेकमत न्यूज नेटवर्कआरमाेरी : आजपर्यंत पुरुषच ट्रॅक्टर व इतर सर्व वाहने चालविताना आपण बघितले आहे. पण, आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील मयूरी मातेरे ही विद्यार्थिनी याला अपवाद ठरली आहे. तिच्या मनातील जिद्द आणि परिश्रमासमोर आकाशही ठेंगणे झाले आहे. ग्रामीण भागातील ही युवती स्वतः ट्रॅक्टर चालवून घरची शेतीची नांगरणी, वखरणी व इतर कामे करीत असल्याने तिच्या धाडसाचे आणि कर्तबगारीचे कौतुक केले जात आहे. मनात काहीतरी शिकण्याची जिद्द आणि त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास या जगात काहीच अशक्य नाही. आज विज्ञान व तंत्रज्ञानाने प्रगती केल्यामुळे महिला आकाशात उंच भरारी घेऊ लागल्या. विविध क्षेत्रांत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला गरुडझेप घेऊन आपल्या कार्याचा ठसा उमटविताना दिसत आहेत.सद्य:स्थितीत शेती व्यवसायात दरराेज एक नवे आव्हान व संकट येतच आहे. मात्र, त्या संकटांना डगमगून न जाता जे ठामपणे पाय रोवून उभे राहतात, तेच चांगल्या पद्धतीने शेती करू शकतात. आजचे शिक्षण घेणारी मुले व मुली ही शेतीकडे दुर्लक्ष करून नोकरीच्या मागे लागताना दिसत आहेत. मुळातच शेती हा विषयच त्यांच्या डोक्याबाहेरचा असतो. वडिलांना शेतीच्या कामात साधी मदतही करताना दिसत नाही. अशा मुलामुलींसाठी भूमिकन्या मयूरी ही एक आदर्श ठरणारी आहे. तालुक्यातील पाथरगोटा येथील मयूरी यशवंत मातेरे ही शिक्षणासाेबतच घरच्या शेतीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहे. घरचा ट्रॅक्टर स्वतः शेतात चालवून शेतीची मशागत करीत आहे. मयूरीच्या घरी सात एकर शेती आहे. वडील हे आरटी वर्कर म्हणून आरोग्य विभागात काम करतात, तर आई महिला आर्थिक विकास महामंडळातच व्यवस्थापक म्हणून काम करीत आहे. मयूरी ही शिक्षणात अतिशय हुशार असून ती बारावी विज्ञान शाखेतून ६४ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तिला शेतीसोबत आरोग्याच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याने नागपूर येथील लता मंगेशकर नर्सिंग कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला आहे. मयूरी ही सर्वगुणसंपन्न असलेली युवती असून आजपर्यंत अनेक क्षेत्रांत तिने नाव चमकविले आहे. तिचा अनेकदा सत्कारही झाला आहे. मयूरीच्या घरी ट्रॅक्टर आहे, त्यामुळे तिला ट्रॅक्टर चालविण्याची खूप जिद्द होती. मुलीने ट्रॅक्टर चालवायचा, ही न पटणारी बाब होती. पण, तिने ट्रॅक्टर चालवायला शिकण्याचे धाडस केले आणि यासाठी आई-वडील व आजी-आजोबांनी प्रोत्साहन दिल्याने तिच्या इच्छेला बळ मिळाले.
मुलाची उणीव कधीच भासली नाहीमला दोन्ही मुली आहेत, पण त्या मला मुलासारख्याच आहेत. त्यामुळे मुलाची कधीच उणीव भासली नाही. तिला ट्रॅक्टर शिकण्याची जिद्द होती आणि तिने ती पूर्ण केली. रोवणीसाठी चिखल करण्याचे कठीण काम असतानाही ती काम करीत आहे. तिचा मला अभिमान वाटतो. पुढे ज्या-ज्या क्षेत्रातील काम करेल, त्या क्षेत्रात ती नक्कीच यशस्वी होईल आणि संधीचे सोने करेल, असा आशावाद मयूरीची आई यामिनी मातेरे यांनी व्यक्त केला.
चालकाकडून घेतले ड्रायव्हिंगचे धडेदादा, ‘मला ट्रॅक्टर चालविणे शिकव रे’, असे म्हणून चालकाकडून ट्रॅक्टर चालविण्याचे धडे घेतले. आता ती गेल्या दोन वर्षांपासून ट्रॅक्टर स्वतः चालवून घरच्या शेतीची मशागत करीत आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचालकावर होणारा खर्च मयूरीमुळे बचत झाला आहे. पावसाळी आणि उन्हाळी धानपिकाची नांगरणी आणि चिखलणी ती स्वतःच ट्रॅक्टरद्वारे करीत आहे. लाॅकडाऊनमुळे कॉलेज बंद राहिल्यामुळे या वेळेचा तिने चांगलाच सदुपयोग केला आहे.