चामोर्शी तालुक्यात कुनघाडा(रै.) हे गाव लोकसंख्येने बरेच मोठे आहे. गावातील ग्रामपंचायत सदस्यसंख्या १५ आहे. गावाची लाेकसंख्या १० हजारांच्या आसपास आहे. कुनघाडा(रै.) हे गाव जिल्हा परिषद क्षेत्राचे केंद्रबिंदू असून या जि.प.क्षेत्रांतर्गत कुनघाडा, गिलगाव, तळोधी व नवेगाव असे दोन पंचायत समिती गण आहेत. सदर जि.प.क्षेत्रात २५ गावाचा समावेश असून क्षेत्राची लोकसंख्या जवळपास २५ ते २६ हजार आहे. कुनघाडा (रै.) जि.प. क्षेत्रांतर्गत कुनघाडा (रै.) तळोधी, नवेगाव, गिलगाव, माल्लेरमाल, नवरगाव, भाडभिडी अशा एकूण ७ ग्रामपंचायतचा समावेश आहे. परिसराचे मुख्य केंद्र बिंदू कुनघाडा(रै.) असल्यामुळे बाहेरुन येणारे राजकीय पदाधिकारी शासकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना कुनघाडा येथे थांबून विविध सभा घ्याव्या लागतात. तसेच विश्रांतीसाठी विश्रामगृहाची आवश्यकता आहे. मात्र विश्रामगृह नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत भवन किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी थांबून सभा घ्याव्या लागतात. ग्रामपंचायत भवन किंवा सदस्यांच्या घरी पुरेशा सोयी सुविधा नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. क्षेत्राचे खासदार, आमदार, तसेच मंत्री किंवा मंत्र्यांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी भेटी देत असतात. भेटीदरम्यान नेमके कुठे थांबावे, असा प्रश्न त्यांना पडताे. आजपर्यंतच्या कालखंडात कुनघाडा(रै.) हे गाव राजकीय पदाधिकाऱ्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातून जिल्हा परिषद अध्यक्षांपासून सभापती ते पंचायत समिती सभापतीचे पद भूषविले आहे. मात्र पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतमुळे क्षेत्राचा विकास खुंटला आहे.
विश्रामगृहाअभावी ग्रामपंचायत भवनाचा आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:32 AM