गडचिरोली : मुलचेरा येथील नगरपंचायतच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे विकास ईश्वर नैताम यांची अविरोध निवड झाली. उपाध्यक्ष पदाकरिता आदिवासी विद्यार्थी संघातर्फे सुनीता रमेश कुसनाके व जास्वंदा गोंगले यांनी तर राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे उमेश पेडुकर व मधुकर वेलादी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
आविसच्या जास्वंदा गोंगले यांचे एकच सूचक दोनदा झाल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेश पेडुकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी आविस तर्फे सुनीता रमेश कुसनाके तर राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे मधुकर वेलादी यांच्यात लढत झाली. आविसच्या सुनीता कुसनाके यांना ३ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर वेलादी यांना १४ मते मिळाली. निवडणुकीत राष्ट्रवादी आणि सेनेची युती होती. निवडणुकीनंतर मात्र युती संपुष्टात आली.
सेनेने अपक्ष आणि आविसच्या मदतीने अध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात घातली. उपाध्यक्ष पदासाठी आविसने कंबर कसली होती. मात्र, शिवसेनेच्या काही नगरसेवकांमध्ये सुनीता कुसनाके यांच्याबद्दल नाराजी होती. त्यामुळे आज उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस ६, शिवसेना ४ व अपक्ष ४ अशी १४ मतं मिळाली. उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम,मुख्याधिकारी साळवे यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी जि.प. चे बांधकाम सभापती युधिष्ठीर बिश्वास,कोठारी ग्रामपंचायतचे उपसरपंच मनोज बंडावार, लतीफ शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.