पावसाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या रोवणीची कामे खोळंबलेली आहेत. ज्या शेतकऱ्यांची रोवणी झाली त्यांचे धान पीक पाण्याअभावी सुकत आहेत. महावितरणकडे वारंवार मागणी करूनदेखील लोडशेडिंग बंद झाले नाही. त्यामुळे शेकडो संतप्त शेतकरी या काळे फासो आंदोलनासाठी महावितरणच्या कार्यालयावर धडकले. या वेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली.
जोपर्यंत कृषी पंपाची लोडशेडिंग बंद करत नाही, तोपर्यंत ठिय्या उठणार नाही, अशी भूमिका जिल्हाप्रमुख चंदेल यांनी घेतली. मोर्चेकऱ्यांच्या सोबतीला महावितरणचे अधिकारी व कर्मचारीसुद्धा खालीच बसले होते. जवळपास सहा तास ठिय्या आंदोलन चालले. बातमी लिहिपर्यंत महावितरणकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नव्हते. या वेळी जि.प.च्या माजी सदस्य सुनंदा आतला, सीमा पाराशर, गीता मेश्राम, नंदू चावला, विकास प्रधान, नवनाथ उके यांच्यासह शिवसैनिक उपस्थित हाेते.