आरमोरी-देसाईगंज या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या राज्य मार्गांवरुन मोठ्या प्रमाणात जड वाहतूक केली जाते. दरम्यान किन्हाळा-मोहटोला परिसरात अलिकडे विदेशात मागणी असलेले कारले मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जात आहेत. त्यामुळे या मार्गांवरुन दैनंदिन आवागमनात सातत्याने वाढ होत आहे.
शिवराजपूर या गावच्या शेवटच्या टोकापासून किन्हाळा-मोहटोलापर्यंत जंगलव्याप्त परिसर आहे. या भागात हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. असे असताना मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागताे. वन्य प्राणी पाण्याच्या शोधात सदर मार्गाने लगतच्या गाढवी नदीकडे धाव घेतात. याच दरम्यान संथगतीच्या रहदारीमुळे हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला केव्हाही हाेऊन जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे चारचाकी वाहनांचे टायर फुटून अनेक किरकाेळ अपघात घडले आहेत. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
जंगलात अनेक प्राण्यांचा वावर
शिवराजपूर-किन्हाळा जंगल परिसरात रानरेड्यांसह रानकुत्रे, वाघ, बिबट, हरीण, ससे, सांबर, नीलघाेडे यासह अन्य प्राण्यांचा वावर आहे. हे सर्व प्राणी परिसरातील तलावात पाणी पिण्यासाठी येतात. याच दरम्यान त्यांना राज्य मार्ग ओलांडावा लागताे. आरमोरी-देसाईगंज या राष्ट्रीय महामार्गाशी जोडल्या गेलेल्या या राज्य मार्गाच्या दुरवस्थेमुळे संथगतीने सुरू असलेली वाहतुकीची समस्या लक्षात घेता या मार्गाचे लवकर नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.