जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धडकले : दुकान गाळे खाली करा गडचिरोली : जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ गडचिरोलीच्या वतीने एलआयसी कार्यालय परिसरात १९८६ मध्ये दुकानगाळे बांधण्यात आले. मात्र सध्या या ठिकाणी दुकान असलेल्या दुकानदारांना सदर गाळे खाली करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले असून त्या संदर्भाचे पत्रही मिळाले आहे. लिलाव प्रक्रियेमुळे आमच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे. आम्ही भाडेतत्वावर घेतलेले दुकान गाळे खाली करू नये, अशी मागणी दुकानदारांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. सोनापूर कॉम्प्लेक्स परिसरात २४ दुकानगाळे तयार करण्यात आले आहेत. यापैकी १५ दुकानदार प्रती महिना ५०० रूपये प्रमाणे नियमित भाड्याची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अदा करतात. नियमाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानगाळ्याच्या भाड्यात वाढ करावी, मात्र लिलाव प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी दुकानदारांनी यावेळी केली. पत्र परिषदेला दुकानलाईन संघटनेचे अध्यक्ष भोजराज दडवे, उपाध्यक्ष खलीप घुटके, सचिव नितीन पिंपळशेंडे, किरण घोटेकर, शामसुंदर दास, रवींद्र गायकवाड, प्रेमलता महाजन आदी उपस्थित होते. बांधकाम विभागाने दुकानगाळ्याची थातूरमातूर दुरूस्ती केली. या संदर्भात आम्ही संबंधित अभियंत्याकडे तोंडी तक्रार केल्यामुळे लिलाव घेण्याचा अन्यायकारक निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे, असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दुकान गाळे लिलाव प्रक्रियेस दुकानदारांचा प्रखर विरोध
By admin | Published: July 18, 2016 2:12 AM