गडचिरोली : मे महिन्यातच आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली होती. या प्रश्नावर अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. दीपक आत्राम यांनी आदिवासी विकास व अन्न नागरी पुरवठा मंत्री या दोघांकडे खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ३० जूनपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे, अशी माहिती आ. दीपक आत्राम यांनी दिली.गडचिरोली जिल्ह्यात अनेक शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात. विशेषत: सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धान मोठ्या प्रमाणात घेतला जातो. हा धान शेतकरी विक्रीसाठी आणत असतांनाच शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. त्यानंतर दीपक आत्राम यांनी शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. पिचड यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना या संदर्भात बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आदिवासी विकास महामंडळाचे संचालक असलेले आ. दीपक आत्राम यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला व त्यानंतर अनिल देशमुख यांनी आदिवासी विकास महामंडळाचा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. त्यानंतर राज्य सरकारने ३० जूनपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी आपला माल महामंडळाच्या केंद्रावर विकावा, असे आवाहन आ. आत्राम यांनी केले आहे.
३० जूनपर्यंत सुरू राहणार खरेदी केंद्र
By admin | Published: June 12, 2014 12:03 AM