लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कोरोना संसर्गाबाबत जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नवीन नियमावली ३ ऑगस्टपासून लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ३ ऑगस्टला याबाबतचा आदेश जारी केला. त्यात यापूर्वीची दुकाने सुरू ठेवण्याची वेळ दुपारी ४ ऐवजी वाढवून रात्री ८ पर्यंत करण्यात आली आहे. याशिवाय अनेक महिन्यांनंतर शनिवारी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, या दिवाशी दुपारी ३ पर्यंतच दुकाने सुरू राहणार आहेत. तर रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंद राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कुठेही गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हावासीयांना केले आहे. शासन व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील सर्व निर्देश, सूचना, अटी व शर्तींचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक राहणार आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. तर शनिवार आणि रविवारी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा राहणार आहे. जिल्ह्यात नवीन नियमांमुळे आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार आहे.
हे राहणार बंदच- मॉल, सिनेमागृह/नाट्यगृह पुढील आदेशापर्यंत बंद असतील.- धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद असतील.- आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंदच असतील.- शाळा/महाविद्यालये/कोचिंग क्लासेस शिक्षण विभाग आणि उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार सुरू होऊ शकतात.- वाढदिवस, सांस्कृतिक, मनोरंजन, निवडणुका, प्रचार सभा, रॅली, निषेध कार्यक्रम आदी.
रात्री ९ नंतर संचारबंदीजिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू राहणार असल्यामुळे वैध कारणाशिवाय घराबाहेर फिरण्यास मनाई असेल.
विवाहाच्या कार्यक्रमांना सामाजिक अंतर राखून ५० लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम घेण्याची मुभा असेल. त्याचे उल्लंघन केल्यास ५० हजार रुपयांचा दंड आणि संबंधितांवर गुन्हा दाखल होईल.
अंत्यविधी कोविड-१९ निर्देशाच्या अधीन राहून एकूण २० लोकांच्या मर्यादेत पार पाडावा लागणार आहे.
अशी मिळाली निर्बंधात सूट- सार्वजनिक बगीचे, क्रीडांगणे व्यायाम, मॉर्निंग वॉक, सायकलिंग इत्यादी कारणाकरिता सुरू राहतील.- खासगी/शासकीय कार्यालये १०० टक्के उपस्थितीसह सुरू राहतील.- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १०० टक्के क्षमतेसह सुरू ठेवता येणार आहे. मात्र, या वाहनांमध्ये आसन व्यवस्थेव्यतिरिक्त उभ्याने प्रवासी नेण्यास मनाई असेल.- व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स या दुकानांना सोमवार ते शुक्रवार यादरम्यान रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. ही ठिकाणे ५० टक्के क्षमतेसह चालविण्याची अट असेल.- रेस्टॉरंन्ट, उपहारगृह सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि पार्सल सेवा रात्री ८ पर्यंत सुरू राहील.