लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी सरासरी ९६ टक्के पाऊस होणार होता. हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र सुरूवातीच्या काळात अपेक्षित पाऊस बरसला नाही. मात्र त्यानंतर पावसाची आकडेवारी वाढली. दमदार पाऊस झाल्याने यंदा धान, तूर व इतर पिके जोमात आहेत. सद्य:स्थितीत हलक्या प्रतीच्या व कमी मुदतीचे धानपीक अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.सुरूवातीचे मृग, आद्रा, पुनर्वसू हे चांगल्या पावसाचे नक्षत्रात पाऊस कमी प्रमाणात बरसला. परिणामी शेतकरी यंदाचा हंगाम कसा होणार या विवंचनेत सापडला आहे. दरम्यान जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात नियमित पाऊस झाल्याने यंदा धान पिकासोबतच तूर पीकही जोमात आहे.गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने ज्या धानपट्ट्यात खरिपाच्या पिकाची हानी झाली तो भाग वगळता इतर ठिकाणी पीक परिस्थिती उत्तम आहे. यावर्षी सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस झाला. सुरूवातीला विद्युत पंपाच्या सहाय्याने धान रोवणी करण्यात आली. अशा शेतकऱ्यांचे धानाचे पीक बहरले. रासायनिक खताच्या मात्रा पिकांना देण्यात आल्या. दरम्यान गादमाशी, खोडकिडी व इतर रोगांचा धान पिकांवर प्रादुर्भाव झाला. मात्र शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्याने रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला.
गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात तुरीचे पीक शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहे. यावर्षी तुरीचे पीक डौलात असून भरघोष उत्पादन येणार अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे. कमी मुदतीचे धानपीक शेवटच्या टप्यात असून हलक्या पिकासाठी शेतकऱ्यांना अलिकडेच झालेल्या पावसाचा चांगला फायदा झाला आहे. वैरागड परिसरासह संपूर्ण आरमोरी तालुका व गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागात यंदा धान व तुरीचे पीक जोमात असल्याचे दिसून येत आहे.
कृषी कर्मचारी बांधावरयावर्षी धान व इतर पिके जोमात असली तरी वातावरणाच्या बदलामुळे काही भागात धान पिकावर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर उपाययोजना सुचविण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. पिकावरील रोग आटोक्यात आणण्यासाठी फवारणी केली जात आहे.