गडचिरोली : जिल्हाभरातील वन विभागाच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठीही लाकडे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. लाकडांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावात अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पशुपालन योजनांची जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
उपाहारगृहांमध्ये नियमांचे उल्लंघन
गडचिरोली: शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.
गांधी वॉर्डात फवारणीची मागणी
गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या आहेत. यातील बहुतांश नाल्या उपसल्या जात नाही.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
गडचिरोली : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचात स्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी ग्रामीण व दुर्गम भागातील बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. परिणामी त्यांना शासनाच्या योजनाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली असून अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.
रस्त्यावर कचरा; कारवाई करा
देसाईगंज : घंटागाडी वॉर्डात फिरत असतानाही या घंटागाडीत कचरा टाकत नाही. उलट काही लोक तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कठड्यांअभावी अपघाताची शक्यता
चामोर्शी : अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. थंडीच्या दिवसात सकाळच्या सुमारास धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसत नाही. कठडे नसल्याने अपघात होऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लाहेरीत नवीन आराेग्य केंद्र बांधा
भामरागड : लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम सुरू करावे.
एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले आहेत.
सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या
धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतक-यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे. यातून शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतक-यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शेतक-यांसाठी ही बाब फायदेशीर राहणार आहे.
कुरखेडातील नळ जोडणीची तपासणी करा
कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचल्या जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या
धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरते.
डुक्कर बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंड बस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकरांच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
गोकूलनगर वस्तीत सुविधांचा अभाव
गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणा-या गोकूलनगर लगत माता मंदिराच्या पलिकडे अनेक घरांची वस्ती गेल्या काही वर्षांपासून वसली आहे. अनेक कुटुंब या भागात वास्तव्यास आहेत. मात्र सदर भागात पक्के रस्ते, नाली, पथदिवे आदी मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे.
तलाठी व ग्रामसेवकांची वाणवाच
एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी या पाचही तालुक्यात महसूल विभागांतर्गत येणा-या तलाठी व ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी नागरिकांची कामे खोळंबतात.