ऑनलाइन लोकमत
अहेरी, दि. 21 - चंद्रपूर येथून लग्नसमारंभाकरीता सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथे जाण्यासाठी निघालेल्या युवकांच्या कारला आलापल्ली - सिरोंचा मार्गावरील संन्ड्रा गावाजवळ काल रात्री ७ च्या सुमारास अचानक शाट सर्किटमुळे आग लागल्याने कार जळून खाक झाली आहे. मात्र या कारला नक्षलयांनी आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.
प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर येथून ४ युवक रंगय्यापल्ली येथे लग्नसमारंभाकरीता कारने आले होते. या युवकांनी दारूच्या शोधात आलापल्लीपासून २५ किमी अंतरावरील गुड्डीगुडम गाव गाठले. या ठिकाणी दारू कुठे मिळते काय याबाबत नागरिकांकडून जाणून घेतले. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या युवकांनी इंदाराम गेर्रा या गावात दारू ढोसली व काही बियरचा बॉटल सोबत घेऊन परत रंगय्यापल्लीकडे निघाले. संन्ड्रा गावापासून ३ किमी अंतरावर भर जंगलात कारने अचानक पेट घेतला. यावेळी वाहन थांबवून युवकांनी विझविण्याचा प्रयत्न केला. युवकांनी संन्ड्रा येथून पाणी आणले. मात्र तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. युवकांनी दारूच्या नशेत बियरसुद्धा आग विझविण्याचा प्रयत्नात कारवर ओतली. यामुळे आणखी भडका उडाला. यामुळे वाहन चालकाच्या हाताला जखम झाली. सर्वप्रथम लोकमत प्रतिनिधीने घटनास्थळ गाठून परिस्थिती ची पाहणी केली तेव्हा कार पूर्णतः जळून खाक झाली होती. या घटनेबाबत बाबत अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय मोरे व पोलीस विभाग अधिक तपास करीत आहेत.