गडचिरोली : तालुक्यातील पारडी येथील प्रगतीशील शेतकरी चंद्रशेखर रामदास मुरतेली यांनी श्री पद्धतीने धानपिकाची लागवड केली. त्यामुळे धानपिकाच्या उत्पादनात जवळपास २० ते ३० टक्के वाढ होईल, अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. चंद्रशेखर मुरतेली हे नेहमीच अत्याधूनिक पद्धतीने शेती करतात. श्री पद्धतीने धानपिकाची लागवड केल्यास उत्पादनात वाढ होते, असे मार्गदर्शन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्यांनी यावर्षी संपूर्ण शेतात धानपिकाची श्री पद्धतीनेच लागवड केली. दोन रोपट्यांमधील अंतर २५ बाय २५ सेमीचे ठेवले. त्याचबरोबर प्रत्येक चुडमध्ये एकच धानपिकाचे रोपटे लावले. हिरवळीच्या खताचा वापर केला. आवश्यकतेनुसार धानपिकाला युरिया, डिएपी ब्रिगेड हे खत दिले. तणाच्या व्यवस्थापनासाठी कोनोव्हिडरचा वापर केला. त्यामुळे तण काढण्यासाठी होणारा खर्च बऱ्याच प्रमाणात कमी झाला. जिल्हा कृषी विकास अधिकारी कापसे, आत्माचे अधिकारी हरगडे, जांभुळकर, गावचे उपसरपंच काशिनाथ नागोसे, बळीराजा शेतकरी गटाचे अध्यक्ष नेताजी लोंढे, वासुदेव निकुरे, प्रकाश गंडाटे, दिलीप सहारे यांनी धानपिकाची पाहणी केली. धानाच्या लोंबावरून यावर्षी २० ते ३० टक्के जास्तीचे उत्पादन होईल, अशी शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे श्री पद्धतीमुळे धानपिकाच्या उत्पादन खर्चात कपात होऊन उत्पादन वाढत असल्याने या पद्धतीचा अवलंब इतर शेतकऱ्यांनीही करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. (नगर प्रतिनिधी)
श्री पद्धतीने वाढणार धानाचे उत्पादन
By admin | Published: November 03, 2014 11:26 PM