गडचिराेली : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर गडचिराेलीच्या १० किमी परिघात काेंबड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी चिकन मार्केटमध्ये शुकशुकाट दिसून आला. गडचिराेली शहरातील फुले वाॅर्डात तीन काेंबड्या अज्ञात आजाराने मृत्यूमुखी पडल्या. राज्याच्या काही भागात काेंबड्यांवर बर्ड फ्लू या राेगाची साथ आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने गडचिराेली शहर व १० किमीच्या परिघात काेंबड्यांची विक्री व खरेदीवर प्रतिबंध घातले आहेत. गडचिराेली शहराच्या मध्यभागी आठवडी बाजाराजवळच चिकन मार्केट आहे. या बाजारात दिवसभर काेंबड्याचे मांस खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी राहात हाेती. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानंतर चिकन व्यावसायिकांनी ब्राॅयलर, काॅकरेल, पॅरेट या संकरित काेंबड्या ठेवणे बंद केले आहे. या काेंबड्या गावठी काेंबड्यांच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध हाेत असल्याने या काेंबड्यांचा ग्राहक वर्ग अधिक आहे. मात्र, याच काेंबड्या मिळत नसल्याने बाजारपेठेत ग्राहकांचा शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे.
काेराेनाच्या कालावधीत जवळपास तीन महिने दुकाने बंद हाेती. त्यानंतर आता बर्ड फ्लूमुळे दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. दुसरीकडे मटण मार्केट मात्र तेजीत असल्याचे दिसून आले.
बाॅक्स...
ग्रामीण भागातून खरेदी
गडचिराेली शहरात बंदी असली तरी ग्रामीण भागातील चिकनची दुकाने सुरू आहेत. त्यामुळे गडचिराेलीतील दुकाने बंद असल्याचा फारसा परिणाम खवय्यांवर झाला नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक ग्रामीण भागात जाऊन काेंबड्या खरेदी करीत आहेत. संकरीत काेंबड्यांवर बर्ड फ्लूचा धाेका असल्याने गावठी काेंबड्यांची मागणी वाढली आहे. नागरिक ग्रामीण भागात जाऊन काेंबड्या खरेदी करीत आहेत. गडचिराेली येथील चिकन मार्केटमध्येसुद्धा काही विक्रेत्यांकडे गावठी काेंबड्या दिसून आल्या.