काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुरुवातीला दुकाने ४ वाजताच बंद केली जात हाेती. मात्र काही दुकानदार दुकाने बंद करण्यास हळूहळू विलंब करीत हाेते. एकाला बघून दुसरीही दुकाने सुरूच ठेवली जात हाेती. हळूहळू दुकाने सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहत हाेती. कापड दुकाने तर बाहेरून शटर बंद करून रात्री ७ वाजेपर्यंत सुरू राहात हेाती. याबाबत ‘लाेकमत’ने गुरुवारी रिॲलिटी चेक करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या वृत्ताची दखल घेत नगर परिषदेच्या पथकाने बाजारपेठेत दुपारी ४ वाजताच धडक दिली. पथक धडकताच दुकानांचे शटर बंद झाले. दुकानदारांना शिस्त लावण्यासाठी पथकाने दरदिवशी दाैरा करण्याची गरज आहे.
बाॅक्स
कापड दुकानांनी ठाेकले कुलूप
‘शटर बंद, मात्र आतून दुकाने सुरू’ असे व्यवहार प्रामुख्याने शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड दुकानदार करीत हाेते. त्यांच्यावर काेणतीही कारवाई केली जात नसल्याने इतरही दुकाने सुरू हाेती. शुक्रवारीही पथक गेल्यानंतर ही दुकाने काही काळ आतून सुरूच हाेती. ग्राहक संपल्यानंतर जवळपास सायंकाळी ५ वाजता ही दुकाने कायमची बंद करण्यात आली. कापड दुकानदारच प्रामुख्याने नियम माेडत असल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्याची गरज आहे.