पुरुषोत्तम भागडकर
देसाईगंज : खेळ कुणाला दैवाचा कळला... या ओळींची प्रचिती २४ एप्रिलला देसाईगंजमध्ये आली. नातेवाईकाचा लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्रूा एका कुटुंबाने ५० किलोमीटर अंतर दुचाकीवरुन कापले होते. गाव अवघ्या तीन किलोमीटरवर असताना पावसाने गाठले. मात्र, चोरपावलांनी पावसामागून काळ आल्याची कल्पना या निष्पाप कुटुंबाला नव्हती. वीज कडाडल्याने दोन चिमुकल्या भयभीत झाल्यामुळे दाम्पत्याने झाडाखाली आश्रय घेतला, पण विजेने नेमका या झाडाचाच वेध घेतला. वीज कोसळल्याने चौघेही एका क्षणांत मृत्यूमुखी पडले. गाव अदी जवळ असताना नियतीने डाव साधला.
भारत लक्ष्मण राजगडे (३८,रा.आमगाव बुट्टी ता.देसाईगंज) यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नोकरी लागली नाही. शिक्षण घेतानाच गायन व नाट्यकला अवगत केली. त्यालाच जगण्याचे साधन बनवून ते व्यावसायिक नाटकांत गायनाचे काम करत. १२ वर्षांपूर्वी वडील गेले. तिन्ही बहिणी लग्न होऊन सासरी गेल्या. घरात ६५ वर्षांची आई पुष्पा, पत्नी अंकिता (३०), देव्यांशी (५) व मनस्वी (३) या गोंडस मुली. असा हा पाच जणांचा कुटुंबकबिला.
भारत राजगडे हेच कुटुंबात एकमेव कमावते. पत्नी अंकिता यांच्या चुलत आत्याचा विवाह समारंभ २४ एप्रिलला गळगला (ता. कुरखेडा) येथे पार पडला. या सोहळ्यासाठी राजगडे कुटुंबीय तीन दिवसआधीच सासरवाडी चिखलढोकळा (ता.कुरखेडा) येथे गेेले होते. लग्नसमारंभ उरकल्यावर दुपारी दोन वाजता पत्नी व दोन मुलींना घेऊन भारत राजगडे दुचाकीवरून कुरखेडा- देसाईगंजमार्गे आमगाव बुट्टीला जाण्यासाठी निघाले. गाव तीन किलोमीटरवर असताना तुळशी फाटा येथे मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे दुचाकी रस्त्यालगत उभी करून ते एका झाडाच्या आडोशाला गेले होते. मात्र, काही वेळांतच वीज कोसळली अन् चौघेही एकाचवेळी मृत्युमुखी पडले.
काळजाचा ठाव घेणारा दर्दी गायक शेवटी रडवून गेला...
भारत राजगडे यांनी गावात भजनी मंडळ स्थापन केले होते. काही नाटकांतही त्यांनी गायनाचे काम केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन व गवळणी गाऊन ते जनजागरण करत. काळजाचा ठाव घेणाऱ्या गायनामुळे रसिक त्यांना डोक्यावर घेत. गायन कलेतून सर्वांचे मनोरंजन करणारा हा दर्दी गायक २४ एप्रिलला रसिकांना रडवून गेला.
नातेवाईकांचा टाहो, फुटला अश्रूंचा बांध
एकाचवेळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने राजगडे कुटुंबाच्या घरी व देसाईगंज रुग्णालयात नातेवाईक व गावकऱ्यांनी गर्दी केली. वयोवृद्ध पुष्पा यांच्यासह अंकिता राजगडेची आई सत्यवती व वडील माणिक दरवडे यांनी एकच आक्रोश केला, त्यामुळे उपस्थितांचे हृदय हेलावले. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.