सिरोंचा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात गावोगावी मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले. मात्र, भरपूर पाणी लागत असल्याच्या कारणावरून बऱ्याच कुटुंबांनी अलीकडे शौचालयाचा वापर बंद केल्याचे दिसून येत आहे. परिणामी गोदरीमुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घरी शौचालय बांधून तयार असले तरी काही नागरिक लोटा घेऊन उघड्यावर शौचविधी आटोपत असल्याचे दिसून येत आहे. वैयक्तिक शौचालयाचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, या आदेशाला स्थानिक प्रशासनाकडून हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशा त्रिस्तरीय यंत्रणेमार्फत स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, ग्रामीण व दुर्गम भागात शौचालयाच्या वापराबाबत प्रभावी जनजागृती करण्यात न आल्याने सिरोंचा तालुक्याच्या अनेक गावांमध्ये शौचालयाचा वापर होताना दिसून येत नाही. पंचायत समिती प्रशासनाने ठोस पावले उचलून शौचालयाचा वापर न करणाऱ्या कुटुंबावर कारवाई करण्याची गरज आहे. तेव्हाच संपूर्ण सिरोंचा तालुका खऱ्या अर्थाने गोदरीमुक्त होईल. ज्या लाभार्थ्यांनी शौचालयाच्या अनुदानाची उचल करून लाभ घेतला, त्यांची बैठक बोलावून त्यांना मार्गदर्शन करावे, याबाबतची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत व पंचायत समितीवर सोपवावी, अशी मागणी हाेत आहे.