राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सी ३५३ हा साकोलीवरून येऊन गडचिरोली, चामोर्शी, आलापल्ली, सिरोंचा आणि पुढे तेलंगणातील वरंगल येथे समाप्त होतो. सिरोंचा-आलापल्ली महामार्गाचे मागील दोन वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च? करून बांधकाम करण्यात आले. पण पुन्हा या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने आता ते बुजविण्याचे काम सुरू आहे. पण त्या कामातही दर्जा नाही.
दररोज शेकडो नागरिकांना या मार्गावरून तालुका मुख्यालयात कार्यालयीन कामे अथवा बँकिंगच्या कामासाठी यावे लागते. त्यामुळे प्रवाशांना आपले वाहन किंवा बस खड्ड्यातून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. नांदगाव फाट्याजवळ व अमरावती गावाजवळ खड्ड्यांमुळे ट्रक फसून वाहतूक ठप्प होण्याची बाब नित्याचीच झाली होती. या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था गंभीर असल्याची माहिती वरिष्ठ अभियंत्यांना असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
मागील दोन वर्षांपूर्वी व ९ महिन्यांपूर्वी या मार्गावर कोट्यवधींचा निधी खर्च? करूनही मार्गावर एवढे मोठमोठे खड्डे कसे, याची चौकशी आतापर्यंत कोणीही केलेली नाही. त्यावरून अधिकारी-पदाधिकाऱ्यांची साखळीच ्असल्याचे दिसून येते.
खड्डे बुजवल्यानंतरही काही दिवसांनी पुन्हा या महामार्गाची अवस्था वाईट होणार यात शंका नाही. याचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.
गेल्या पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गावरचे डांबरीकरण उखडून माती बाहेर पडून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यात ट्रक फसून अनेक वेळा ट्रॅफिक जाम झाला. अशा स्थितीत एखादा रुग्ण त्यात फसल्यास आणि त्याचे बरेवाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
(बॉक्स)
खड्डे बुजवण्यावर आतापर्यंत किती खर्च?
सध्या सुरू असलेले खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. वापरलेली गिट्टी आणि डांबर योग्य दर्जाचे नसून खड्ड्यांमध्ये डांबर कमी आणि गिट्टीच जास्त टाकली जात आहे. दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी असा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च? केला जातो. मात्र काम योग्यप्रकारे होत नाही आणि परिस्थिती जैसे थे होते. आतापर्यंत अशा खड्डे बुजवण्यावर किती रुपयांचा निधी खर्च? झाला याचाही हिशेब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.