गडचिरोली : जिल्ह्यात सुमारे दीड आठवड्यापासून थैमान घालत असलेल्या पावसाने दोन दिवस थोडी उसंत घेतल्यानंतर रविवारी पुन्हा जोरदार मुसंडी मारली. सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत जिल्हाभरात सरासरी १०७.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. गोसेखुर्द आणि मेडीगड्डामधील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आदी नद्यांसह उपनद्यांचे पाणी लगतच्या शेतांसह गावांमध्ये शिरले आहे. यासोबत अनेक ठेंगणे पूलही पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यात काही प्रमुख मार्गावरील वाहतूकही वारंवार खंडित होत आहे.
सिरोंचा तालुक्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आता पाण्याला उतरती कळा लागली असली तरी जिकडे-तिकडे अजूनही पाणी आणि गाळ साचलेला आहे. ज्या गावांना पाण्याचा वेढा पडला तेथील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी आश्रय दिला असून आता ते लोक हळूहळू आपापल्या गावी परतू लागले आहेत. भामरागड, अहेरी तालुक्यांत अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने तीन दिवस पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सोमवार ते बुधवार असे तीन दिवस जिल्हाभरातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.
एनडीआरएफचे पथकही जिल्ह्यात दाखल
दरम्यान, पूरग्रस्त नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्य आणि जिल्हा आपत्ती निवारण पथकाच्या मदतीला दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकही (एनडीआरएफ) जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकांनी अनेक ठिकाणी गर्भवती महिला, बाळंत महिलांसह रुग्णांना मोटारबोटच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मदत केली.
शेतीचे सर्वाधिक नुकसान
जलाशयांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शेतजमिनीचे आणि पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ६ लोकांचा बळी गेला आहे, तर अनेक जनावरेही दगावली आहेत. कच्च्या घरांचीही पडझड झाली आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.