शेतकरी संकटातच : बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा उपयोग नाही; प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा फटकासिरोंचा : तालुक्यालगतच्या सीमावर्ती तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील शेवटची गावे सिंचन सुविधेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहेत. मात्र शासन व प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सिरोंचा तालुक्यातील सिंचन योजनेचा बट्ट्याबोळ झाला. परिणामी बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही सिरोंचा तालुका सिंचनाच्या बाबतीत कोरडाच असल्याचे दिसून येत आहे. प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही काठावरील रेगुंठा, मुयाबिनपेठा, नरसिंहपल्ली, कोरला, किष्टय्यापल्ली, रामेशगुड्डम, झिंगानूर, मंगीगुड्डम, वडदेल्ली भागातील असंख्य गावे अद्यापही सिंचन सुविधेच्या प्रतीक्षेत आहे. ९० च्या दशकात जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत दोन कोटी रूपये खर्च करून तालुक्यात उच्च क्षमतेच्या १२९ कुपनलिका खोदण्यात आल्या. यापैकी केवळ ४९ कुपनलिका सुरू झाल्या. उर्वरित ८० कुपनलिका सुरू होण्यापूर्वीच आदी सुरू झालेल्या ४९ कुपनलिका बंद पडल्या. सद्य:स्थिती १२९ कुपनलिकेचे अस्तित्वच राहिले नाही. पाणी वाटप सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली आणण्याच्या उदात हेतुला हरताळ फासला गेला. अनेक संस्थांनी विद्युत मंडळाकडे डिमांडचा भरणा करूनही विद्युत जोडणी करण्यात आली नाही. याशिवाय जिल्हा परिषदेच्या अखत्यारित सिरोंचा तालुक्यातील सात कोल्हापुरी बंधारे व दोन तलाव आहेत. मात्र दुरावस्थेमुळे या बंधारे व तलावाचाही या भागातील शेतकऱ्यांना फारसा उपयोग होत नाही. अमरादी कोल्हापुरी बंधारा अंकिसा चक, असरअल्ली, गोलागुड्डम, सुंकरल्ली, मुयाबिनपेठा, नरसिंहपल्ली येथील बंधारेही दुरावस्थेत आहे. कारसपल्ली व सिरकोंडा येथे नवीन सिंचन तलाव आहेत. सिरोंचालगतची धर्मपुरी उपसा सिंचन योजना मागील ३० वर्षांपासून रखडली आहे. रेगुंठा सिंचन योजना ही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सीमावर्तीय तेलंगणा व छत्तीसगड राज्याकडून प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांचा पुरेपूर उपयोग केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)लाखो रूपयांचा खर्च व्यर्थसिरोंचा तालुक्यातील सात कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामासाठी २५ लाख ७४ हजार ८०४ रूपयांचा खर्च झाला. त्यानंतर २० लाख १७ हजार ३९१ रूपये दुरूस्तीवर खर्च करण्यात आले. सिरकोंडा तलावाच्या बांधकामासाठी ६ लाख ८५ हजार रूपयांचा खर्च आला. याशिवाय दुरूस्तीवर ३ लाख २० हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. कारसपल्ली तलावासाठी सात लाखांचा खर्च करण्यात आला असून दुरूस्तीवर ३ लाख ७० हजार रूपयांचा खर्च प्रशासनाने केला. या तलाव व बंधाऱ्याची दरवर्षी दुरूस्ती केली जाते. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात सिंचन सुविधा मिळत नाही. परिणामी या भागातील शेतकरी दरवर्षी दुष्काळाच्या संकटात सापडतात.
सिरोंचा तालुक्यात सिंचन योजनेचा पुरता बट्ट्याबोळ
By admin | Published: December 28, 2015 1:37 AM