कौसर खान लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : चंद्रपूरच्या महाऔष्णिक विद्युत केंद्रातून आतापर्यंत सिरोंचा तालुक्याला होत असलेल्या वीजपुरवठ्यात अनेक अडचणी येत होत्या. मध्ये लागणाऱ्या जंगलाच्या भागामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असे; पण आता ही समस्या कायमची दूर होणार आहे. चक्क तेलंगणा राज्याच्या सरकारी वीज कंपनीमार्फत आता तालुक्याला वीजपुरवठा केला जाणार असून त्याची तयारी जोमाने सुरू आहे. सिरोंचा तालुक्याला लागून असलेल्या आणि सिरोंचापासून २२ किलोमीटरवर असलेल्या किष्टमपेठ येथील १३२ किलोवॅट सब स्टेशनवरून सिरोंचाला वीजपुरवठा घेतला जाणार आहे. त्यासाठी सिरोंचा येथील ६६ केव्हीचे सब स्टेशन वाढवून ते १३२ केव्हीचे केले जात आहे. या पद्धतीने तेलंगणातून वीजपुरवठा घेऊन तालुक्याची वीज समस्या दूर करावी, अशी अनेक दिवसांची मागणी होती. तेलंगणातील रामगुंडम येथील ४००० मेगावॅटच्या महाऔष्णिक विद्युत केंद्रातून किष्टमपेठच्या १३२ केव्ही सब स्टेशनला वीजपुरवठा होतो. तेथून तो आता सिरोंचापर्यंत लांबवला जात आहे. किष्टमपेठ व सिरोंचा सबस्टेशन जोडल्यानंतर तालुक्यातील रेगुंठा, झिंगानूर येथेही छोटे सबस्टेशन होणार असून प्रत्येक गावांत घरगुती आणि शेतीच्या वापरासाठी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
जंगलामुळे वीजपुरवठ्यात अडथळा सध्या आष्टी-आलापल्ली या मार्गाने सिरोंचा तालुक्याला वीजपुरवठा होतो. मार्गात घनदाट जंगल असल्यामुळे पावसाळ्यात वादळी वाऱ्याने झाड पडून किंवा एकमेकांना स्पर्शून वीजपुरवठा खंडित होतो. याशिवाय पुराच्या पाण्यात सिरोंचाजवळील विद्युत खांब पाण्यात बुडून वीजपुरवठा बंद होतो. ही समस्या आता दूर होणार आहे.
किष्टमपेठ ते सिरोंचा यादरम्यान वीज वाहून आणण्यासाठी ११३ टॉवरच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. याशिवाय अजून लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहणही सुरू आहे. या कामानंतर आलापल्लीवरून विद्युत पुरवठा खंडित झाला तरी तेलंगणातून तो सुरू राहणार आहे.