गडचिराेली : जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत १८ वर्षांखालील सुमारे २६ मुली पळून गेल्या. त्यापैकी १८ मुलींचा शाेध घेण्यात पाेलिसांना यश आले आहे तर ८ मुलींचा शाेध घेण्याचे काम सुरू आहे.
१४ ते १८ या वयाेगटातील मुली मन व शरीराने फारशा परिपक्व राहत नाहीत. भावनेच्या आहारी जाऊन त्या निर्णय घेतात. पळून जाणाऱ्या बहुतांश मुली स्वत:च्या मर्जीने प्रियकरासाेबत पळून जातात; मात्र त्या अल्पवयीन असल्याने याबाबतची तक्रार तिच्या पालकांमार्फत पाेलीस स्टेशनमध्ये दाखल केली जाते. पालकांच्या तक्रारीवरून पाेलीस स्टेशनमध्ये प्रियकराविराेधात अपहरणाचा गुन्हा दाखल हाेतो. पालकांच्या तक्रारीवरून मुलीचा शाेध घेण्याची जबाबदारी पाेलिसांवर येऊन पडते व पाेलीस तिचा शाेध घेतात. दिवसेंदिवस अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे.
बाॅक्स....
मुली चुकतात कुठे?
उदाहरण १
आज प्रत्येकाच्या घरी स्मार्टफाेन उपलब्ध आहे. मुली फाेनचा वापर सर्वाधिक करतात. फाेनच्या माध्यमातून अश्लील चित्र, व्हिडीओ बघितले जातात. यातून मुलीच्या भावना उत्तेजित हाेऊन मुलांप्रति आकर्षण वाढते. मुलगी जर माेबाइलचा वापर करीत असेल तर पालकांनी तिच्यावर थाेडीफार लक्ष ठेवण्याची गरज आहे.
उदाहरण २
गडचिराेली शहरातील एका मुलीची ओळख मुलासाेबत झाली. यातून मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यावेळी मुलगी केवळ दहाव्या वर्गात शिकत हाेती. म्हणजेच केवळ १४ वर्षांची हाेती. मुलगा मात्र २२ वर्षांचा हाेता. दाेघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेऊन ते घरून पळून गेले; मात्र लग्न हाेऊ शकले नाही. शेवटी आईवडिलांकडे मुलीला परत यावे लागले. यात मुलीची माेठी बदनामी झाली, शाळाही साेडावी लागली.
उदाहरण ३
सहकारी मैत्रीण यांची संगत कशी आहे, या गाेष्टी महत्त्वाच्या आहेत. घरातील वातावरण चांगले असले तरी वाईट मैत्रिणीची संगत असल्यास मुलगी बिघडण्याची शक्यता अधिक राहते. आपली मुलगी कुणासाेबत बाेलते, तिच्या मैत्रिणी काेणत्या, त्या काय करतात, याची माहिती पालकांनी न ठेवल्यास स्वत:ची मुलगीही बिघडण्याची शक्यता राहते.
बाॅक्स...
अल्पवयीन मुली बेपत्ता
२०१८ - ३१
२०१९ - ३७
२०२० - २८
२०२१ - २६
बाॅक्स...
मुला-मुलींचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र
- मुला-मुलींशी प्रत्येक पालकाने मैत्री करावी. प्रत्येक गोष्ट, सभोवताली घडणाऱ्या घटना, चांगले-वाईट हे त्यांना समजावून सांगावे. कोणताच संकोच मनात बाळगू नये.
- अल्पवयात मुला-मुलींना समज कमी असते. बाहेरील मित्र-मैत्रिणी यांच्याशी जास्त वेळ गप्पा होत असल्या, तर त्याबाबत त्यांना समजावून सांगितले पाहिजे, एखाद्या मुलाचे, मुलीचे पाऊल चुकीचे पडत असेल, तर लगेच लक्षात येते. त्याबाबत त्यांना प्रेमाने व मैत्रीच्या नात्याने समजावून सांगणे केव्हाही चांगले.
- वयाच्या १५ वर्षांनंतर मुला-मुलींमध्ये बदल जाणवतो. मोबाइलचा अति वापर केव्हाही टाळला पाहिजे. मुलांना ते समजावून सांगावे, ऑनलाइन अभ्यासाच्या व्यतिरिक्त मोबाइल हाताळू देऊ नये. मोबाइल का जास्त वापरू नये, त्याची काही उदाहरणे देऊन मुलांना ते पटवून सांगितले पाहिजे.
-आईने मुलीशी तर वडिलांनी मुलांशी खुलून गप्पा केल्या, तर ते त्यांच्या नजरेसमोर घडणाऱ्या घटना, घडामोडी पालकांना सांगतात. नेमकी काय चूक झाली, कशामुळे झाली, हे आपण त्यांना समजावून सांगू शकतो.