टीडीसीकडून विलंब : तीन महिन्यांपासून उचल नाही घोट : आदिवासी विकास महामंडळाच्या घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मक्केपल्लीच्या वतीने यंदाच्या हंगामात धान खरेदी करण्यात आली. मात्र महामंडळाच्या घोट उपप्रादेशिक कार्यालयामार्फत धानाची उचल करण्यात विलंब होत असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून तब्बल ६ हजार १०६ क्विंटल धान ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आले आहे. सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने उघड्यावर ठेवण्यात आलेले ८९ लाख ७५ हजार रूपये किंमतीच्या धानाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आरमोरी, कुरखेडा, कोरची, धानोरा तसेच घोट या उपप्रादेशिक कार्यालयामार्फत सहकारी संस्थांच्या वतीने दरवर्षी कोट्यवधी रूपये किंमतीच्या धानाची खरेदी केली जाते. मात्र महामंडळ तसेच सहकारी संस्थांकडे साठवणुकीसाठी पुरेसे गोदाम नसल्याने हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून राहतो. परिणामी आदिवासी विकास महामंडळाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावी लागते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन सहकारी संस्थांना गोदामची व्यवस्था करण्याचे बंधन घालून दिले. मात्र त्यानंतरही अनेक केंद्रावर पुरेशी गोदाम व्यवस्था नाही. परिणामी मक्केपल्लीसह अनेक ठिकाणच्या केंद्रावरील गोदाम खरेदी केलेल्या धानाने आता फुल्ल झाले आहेत. घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मक्केपल्ली येथील केंद्र २४ नोव्हेंबर २०१६ पासून सुरू करण्यात आले. सहकारी संस्थेने २४ डिसेंबर २०१६ पर्यंत एकूण ३१३९.६० क्विंटल धानाची खरेदी केली. सदर धानाची खरेदी कृषी गोदामात करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन २५ डिसेंबर २०१६ पासून बाहेर उघड्यावर धान खरेदी करण्यात आली. २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत या केंद्रावर एकूण ९६४५.६० क्विंटल धान खरेदी झाली. यापैकी तळोधी येथील राईसमिलला मिलींग करिता ४०० क्विंटल धान देण्यात आला. सद्य:स्थितीत या केंद्रावर ९२४५.६० क्विंटल धान शिल्लक असून ३१३९.६० क्विंटल धान कृषी गोदामात ठेवण्यात आला आहे. उर्वरित तब्बल ६ हजार १०६ क्विंटल धान उघड्यावर ठेवण्यात आला आहे. खरेदी केलेला सदर उघड्यावरील धानाची तत्काळ उचल करण्यात यावी, या आशयाचे पत्र आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मक्केपल्लीच्या व्यवस्थापकाने उपप्रादेशिक व्यवस्थापक घोट यांना पाठविले आहे. सदर पत्राची प्रत प्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय, गडचिरोली यांना पाठविली आहे. मात्र महामंडळाने अद्यापही धानाची उचल करण्याबाबत कारवाई केली नाही. (वार्ताहर) ताडपत्र्यांचा पुरवठा नाही खरेदी केलेले धान मक्केपल्ली केंद्राच्या परिसरात उघड्यावर ठेवण्यात आले आहे. पावसापासून या धानाची सुरक्षितता व्हावी, याकरिता ताडपत्र्यांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र महामंडळाकडून धान झाकून ठेवण्यासाठी ताडपत्र्यांचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे जुन्या फाटक्या ताडपत्र्या धानावर झाकून ठेवण्यात आले आहे. बारदाना जुना असल्याने अधिक नुकसानीची शक्यता मक्केपल्ली येथील सहकारी संस्थेच्या केंद्रावर जुना बारदाना वापरून धानाची खरेदी करण्यात आली. या केंद्राच्या परिसरात उघड्यावर गेल्या तीन महिन्यांपासून ६ हजार १०६ क्विंटल धान ठेवण्यात आला आहे. ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसामुळे बारदाना जुना असल्याने धानाचे पोते खराब होऊन अधिक नुकसान होण्याची शक्यता मक्केपल्ली संस्थेच्या व्यवस्थापकाने पत्रात म्हटले आहे. धानाची उचल करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात उचल झाली नाही.
सहा हजार क्विंटल धान उघड्यावरच
By admin | Published: March 16, 2017 1:12 AM