रेती अवैध उत्खनन व वाहतूक : आमदारांनी तहसीलदारांसह टाकली दोटकुली रेती घाटावर धाडचामोर्शी : तालुक्यातील वैनगंगा नदीवरील दोटकुली घाटावर रेतीची अवैध उत्खनन व वाहतूक करताना सहा ट्रक व दोन पोकलँड मशीन शनिवारी जप्त करण्यात आले. सदर कारवाई आ. डॉ. देवराव होळी व तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी केली. आमदार व तहसीलदारांनी मिळून केलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.चामोर्शी तहसील अंतर्गत ९ घाट असून सर्व ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक वाळूचा उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची जनतेची ओरड होती. कार्यकर्त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आ. डॉ. देवराव होळी यांनी तहसीलदार यू. जी. वैद्य यांच्यासह दोटकुली रेती घाटावर शनिवारी आकस्मिक धाड टाकली. दरम्यान, या घाटावर दोन ट्रक रेती वाहून नेण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून आले. तर चार ट्रक नदीपात्रात रेती भरण्यासाठी उभे होते. तसेच दोन पोकलँडही नदीपात्रात उभे असल्याचे आढळून आले. आ. डॉ. होळी यांनी तत्काळ चामोर्शी पोलीस ठाण्याला फोन करून पोलिसांना तत्काळ घटनास्थळी बोलाविले. पोलीस निरीक्षक किरण अवचार हे फौजफाटा घेऊन रेती घाटावर हजर झाले. त्यांनी पंचनामा करण्याचे निर्देश दिले. एपीओआयव्ही - ४०१४, एपीओआयव्ही - ३५४०, एपीओआय - ६३८९, टीएसओआययूए - ३८५९, एपीओआयव्ही - ८२९२ व एपीओआयएक्स - ४५१८ या क्रमांकांचे दहाचाकी सहा ट्रक व दोन पोकलँड घटनास्थळी जप्त केले. याप्रसंगी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, मनोज पालारपवार, माणिक कोहळे, जयराम चलाख, नरेश अल्सावार, ज्ञानेश्वर कुनघाडकर उपस्थित होते. वाळूमाफियांवर कठोर कारवाई कराचामोर्शी : आ. डॉ. होळी म्हणाले, तालुक्यातील नऊ घाटावरील लिलावात नमूद केलेल्या जागेच्या व्यतिरिक्त अवैधरीत्या रेतीचे उत्खनन सुरू आहे. तसेच लिलावातील नमूद जागेवरदेखील क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन सुरू आहे. अवैधरीत्या रेतीचा साठा मोठ्या प्रमाणात करून ठेवला आहे. त्याची परवानगीसुद्धा शासनाकडून अद्याप मिळाली नाही. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने दोन ते तीन कोटींचे अवैध उत्खनन होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना सूचना देऊन दोन घाटावर धाड टाकली असता, अवैध उत्खनन होत असल्याचे दिसून आले. अशाच प्रकारे संपूर्ण जिल्ह्यात वैनगंगा नदीवर वाळू माफीयांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आ. डॉ. होळी यांनी केली. तहसीलदार वैद्य म्हणाले, दोटकुली घाटावर मंजूरपेक्षा अधिक उत्खनन झाले असल्याचे दिसून येत आहे. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व आरआय यांची समिती गठित करून चौकशीचे आदेश दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)
सहा ट्रक व दोन पोकलँड जप्त
By admin | Published: June 05, 2016 1:01 AM