देसाईगंज (गडचिरोली) : तब्बल दहा महिन्यांपूर्वी गायब झालेल्या युवतीच्या हत्येला अखेर वाचा फुटली आहे. तिच्या प्रियकरानेच आपल्या मित्राच्या मदतीने तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. सदर युवती कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील रहिवासी होती.
या प्रकरणात प्रियकराला हत्येसाठी मदत करणाऱ्या मित्राला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली असून, प्रियकर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेवाडा येथील ऐश्वर्या दिगंबर खोब्रागडे (२०) ही ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे फार्मसी कॉलेजला शिक्षण घेत होती. यादरम्यान १० ऑगस्ट २०२१ला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी ब्रह्मपुरी पोलिसांकडे केली होती.
सदर मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे देसाईगंज येथील तुषार ऊर्फ तरुण राजू बुज्जेवार याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने ऐश्वर्याच्या गायब होण्यामागील रहस्य उघड केले. घटनास्थळावरून मुलीचा मृतदेह काढण्यात आला. तिची बॅगही झुडूपातून काढली. युवतीचे साहित्य, चप्पल आणि जिन्स पॅन्टवरून वडिलांनी तिची ओळख पटविली.
प्रियकराला सोडवायचा होता तिचा ससेमिरा
या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप पटले याचे देसाईगंजमध्ये वेल्डिंगचे दुकान आहे. ऐश्वर्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्यामुळे तिने त्याला लग्नाची गळ घातली. पण संदीप तिला टाळत होता. ऐश्वर्या आपला पिच्छा सोडत नाही हे पाहून त्याने तिचा ससेमिरा कायमचा सोडविण्यासाठी तिलाच संपवण्याचे ठरविले.
भिंतीवर डोके आपटले; नंतर गळा आवळला
आरोपी तुषार बुज्जेवार याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये ऐश्वर्या हिला संदीप ऊर्फ दुर्गेश रेखलाल पटले याने हरदोली शिवारातील वैनगंगा नदीकिनारी असलेल्या पंप हाउस येथे नेले. तिथे त्याने ऐश्वर्याचे डोके दोन-तीन वेळा भिंतीवर आपटून तिला खाली पाडले. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. नंतर तुषार व संदीप यांनी मिळून तिचा मृतदेह पंप हाउसच्या विहिरीत फेकून दिला. तिची बॅग तिथेच झुडपात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.