दिलीप दहेलकर
गडचिराेली : महाराष्ट्र शासन व टाटा कन्सलटन्शी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील एमआयडीसी मार्गावर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी तब्बल ४ हजार ८०० बेराेजगार तरुणांना काैशल्यावर आधारित प्रशिक्षण मिळणार आहे. या प्रकल्पाद्वारे राेजगार निर्मिती हाेईल. शिवाय, नाेकऱ्या देणारे उद्याेजक तयार हाेतील, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे हे बुधवारला गडचिराेली जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आले हाेते. दरम्यान, त्यांनी सायंकाळच्या सुमारास गाेंडवाना विद्यापीठालगत एमआयडीसी मार्गावर उभारण्यात आलेल्या काैशल्य प्रशिक्षण केंद्राचे लाेकार्पण केले. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी प्रामुख्याने गडचिराेली परिक्षेत्राचे पाेलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिना, पाेलिस अधीक्षक निलाेत्पल, गाेंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे यांच्यासह टाटा कन्सलटन्शीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर प्रकल्पातील प्रत्येक मशीनची पाहणी केली. ऑटोमोबाइल क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज लॅब तयार करण्यात आल्या आहेत. माेठमाेठ्या मशीन येथे लावण्यात आल्या असून, येथे अनेक वस्तू तयार हाेणार आहेत. काेट्यवधी रुपये खर्च करून राज्य शासन व टाटा कन्सलटन्शीच्या संयुक्त विद्यमाने काैशल्यावर आधारित अत्याधुनिक प्रशिक्षण देणारा हा प्रकल्प येथे उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना प्रशिक्षित हाेऊन राेजगार उपलब्ध हाेईल, असा आशावाद ना. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
दुर्गम गडचिराेलीत माेठी अचिव्हमेंट
विद्यमान राज्य सरकार विकासाच्या दृष्टीने गतिशील पाऊल टाकत आहे. गडचिराेली जिल्ह्यात मायनिंग उद्याेग, स्टील प्लांटची उभारणी हाेत असून, यातून हजाराे युवकांना राेजगार मिळणार आहे. त्यात आता गडचिराेली जिल्हा मुख्यालयी इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आले असून येथून काैशल्यपूर्ण व क्षमताधिष्ठित मनुष्यबळ निर्माण हाेणार आहे. दुर्गम गडचिराेली जिल्ह्यातील ही माेठी अचिव्हमेंट आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.