अर्थचक्राला गती देण्याबरोबरच कोरोना संसर्ग रोखणे अशी दुहेरी जबाबदारी आता आपल्याला पार पाडावी लागेल, असे आवाहन ही शिथिलता देताना जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले आहे. ही शिथिलता म्हणजे कोरोना संसर्ग संपला असे नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी खबरदारी घेत आपल्याला त्यावर मात करायची आहे. दुकाने सुरू करत असताना आता संबंधित मालकांवर अधिक जबाबदारी आली आहे. अर्थचक्र सुरू ठेवत कोरोना संसर्ग होऊ देऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. कुठेही गर्दी होता कामा नये. दिलेल्या सूचनांचे पालन करून संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, नाहीतर संसर्ग वाढल्यास पुन्हा सर्व निर्बंध घालावे लागतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्गमित केलेल्या नवीन आदेशांनुसार आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय इतर व्यावसायिकांच्या दुकानांसाठीही हीच वेळ राहाणार आहे. मात्र त्यासाठी दिवस निश्चित करण्यात आले आहेत.
अर्थचक्राला गती देण्यासाठी निर्बंध कमी करत असताना दुकानदारांची जबाबदारी जास्त आहे. व्यापारी असोसिएशनने कोरोना संसर्गाबाबत सर्व खबरदारींचे पालन करणार असल्याचे मान्य केले आहे. तोंडाला मास्क लावणे, शारीरिक अंतर पाळणे तसेच दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांची गर्दी होऊ न देणे यासाठी ग्राहकांसोबत दुकानदारांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
(बॉक्स)
कापड दुकाने, जनरल स्टोअर्स आज उघडणार
- अत्यावश्यक सेवेशिवाय इतर प्रकारच्या दुकानांमध्ये गर्दी टाळण्यासाठी ती दुकाने दोन वेगवेगळ्या दिवसांमध्ये सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
- मंगळवार आणि गुरुवार या दिवशी कपड्यांची दुकाने, चप्पल, सौंदर्यप्रसाधने, जनरल स्टोअर्स व लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने सुरू राहतील.
- बुधवार व शुक्रवार या दिवशी वर उल्लेख केलेली दुकाने बंद राहणार असून, त्याऐवजी इतर व्यवसायातील दुकाने सुरू राहतील.
(बॉक्स)
सलून, ब्यूटिपार्लर बंदच
अत्यावश्यक सेवेतील सोडून इतर बहुतांश दुकानांना परवानगी दिली असली तरी सलून (कटिंगची दुकाने), ब्यूटिपार्लर, जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्रीडा संकुल हे सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. याशिवाय बगिचे व सिनेमागृह बंदच राहतील. पानटपरी/पानठेले, आठवडी बाजार, गुजरी हेसुद्धा बंदच राहतील.
(बॉक्स)
धार्मिक स्थळे, खाणावळीही बंद
हॉटेल, उपाहारगृह, खाणावळही बंदच राहाणार आहेत. मात्र तेथून पार्सल व घरपोच सुविधा सुरू राहील. सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. कृषिविषयक दुकाने मात्र सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडचण होणार नाही.