गडचिरोली : धानोरा मार्गावर असलेल्या चातगाव येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन कामे खोळंबली असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
चातगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून, याठिकाणी अनेक विभागांची शासकीय कार्यालये आहेत. स्टेट बँक, वन विभाग, तलाठी, शाळा, महाविद्यालय आदी कार्यालये आहेत. सध्या सर्व कामे ऑनलाईन केली जात आहेत. याशिवाय याठिकाणी व्यापारी प्रतिष्ठाने व नेट कॅफे आहे. परिसरातील अनेक नागरिक याठिकाणी ऑनलाईन कामे करण्यासाठी येतात. आर्थिक व्यवहार करण्यासाठी येथील स्टेट बँक शाखेत येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे येथील शासकीय कार्यालये व बँकेत आलेल्या नागरिकांना सायंकाळपर्यंत ताटकळत बसावे लागत आहे. परिणामी नागरिकांचा वेळ व पैसा विनाकारण वाया जात आहे.