दिगांबर जवादे
गडचिरोली : स्थानिक पोलिसांनी धानोरा मार्गावरील बसस्थानकाच्या बाजुला असलेल्या झोपडीवजा हॉटेलवर धाड टाकून सव्वाचार किलो गांजासह तिघांना अटक केली. एक आरोपी फरार आहे. ज्या हॉटेलमधून गांजा तस्करांना अटक झाली ते हॉटेल शहरात गांजा पुरवठा करण्याचे मुख्य केंद्र बनले होते. या महिलांकडून गांजा नेमका कुठे विकला जात होता, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सूरज श्रीसनातन बढाई (२४) रा. पाखांजूर (छत्तीसगड), सरस्वती गोकुलदास मुकूल (५०), रश्मी पंकज श्याम (४८) दोघीही हल्ली रा. धानोरा मार्ग गडचिरोली. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सुमन मुजूमदार रा. पाखांजूर हा आराेपी फरार आहे. सूरज व सुमन हे दोघे इंदिरा गांधी चौकातून बसस्थानकाकडे जात होते. या दोघांच्याही पाठीवर बॅग होत्या. तसेच एकाच्या दुचाकीला क्रमांक नव्हता. त्यामुळे वाहतूक पोलिसाला संशय आला. दुचाकी अडविण्याचा प्रयत्न केला असता, दोघेही पळून गेले. बसस्थानकाच्या बाजुला असलेल्या एका झोपडीवजा हॉटेलमध्ये थांबले होते. तोपर्यंत वाहतूक पोलिस इतर पोलिस ताफ्यासह हॉटेलमध्ये पोहोचले.
पोलिसांना बघताच सुमन मुजूमदार हा गांजा त्याच ठिकाणी ठेवून दुचाकी घेऊन फरार झाला. सूरज बढाई हा हॉटेलमध्ये आढळून आला. हॉटेलची तपासणी केली असता हॉटेलमध्ये सव्वा चार किलो गांजा आढळून आला. त्याची किंम्मत ६७ हजार रूपये एवढी होते. हॉटेल चालक सरस्वती व रश्मी या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास केला. चारही जणांविरोधात गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या सूरज, सरस्वती व रश्मी या तिघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सूनावली आहे. अधिक तपास गडचिरोलीचे ठाणेदार अरूण फेगडे करीत आहेत. दोघांकडील दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
यापूर्वीही याच परिसरात कारवाई
वर्षभरापूर्वी गडचिरोली पोलिसांनी याच परिसरात एका गांजा विक्रेत्या महिलेला अटक केली होती. छत्तीसगड राज्यातून विक्रीसाठी गांजा आणल्या जाते. सदर गांजा एखाद्या विक्रेत्याकडे सुपूर्द करतात. त्यानंतर तो विक्रेता चिल्लर विक्री करते. शहरातही काही चिल्लर गांजा विक्रेते आहेत.
छत्तीसगड राज्यातून येणारे गांधी चौकात कसे?
गांजा पोहोचवून देणारे सूरज व सुमन हे दोन आरोपी छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यातील पाखांजूर तालुक्यातील आहेत. त्यामुळे ते निश्चितच धानोरा मार्गे गांधी चौकात येणे अपेक्षित होते. मात्र दोघेही गांधी चौकातून धानोरा मार्गाकडे जात होते. याचा अर्थ शहरात त्यांनी शहरातील दुसऱ्या व्यक्तीला गांजा विकल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचाही शोध पोलिसांनी घ्यावा.