सिरोंचा/कमलापूर (गडचिरोली) : महाराष्ट्र-तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात असलेल्या आणि मौल्यवान सागवान जंगल असलेल्या सिरोंचा वनविभागात पुन्हा एकदा सागवान झाडांची कटाई करून तस्करी करणारे सक्रिय झाले आहेत. रात्रीच्या अंधारात हा सागवान तस्करीचा खेळ सुरू असतो. रात्री गाढ झोपेत राहणाऱ्या सिरोंचा वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना या तस्करीचा मागमुसही लागत नसल्यामुळे त्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सिरोंचा वनविभागात या आधीही तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील तस्करांनी कधी प्राणहिता नदीचा आधार घेऊन तर कधी कल्व्हर्टमधून सागवानाच्या लठ्ठ्यांची वाहतूक केली आहे. सिरोंचा तालुक्यातील जंगलातून तर गेल्या पाच दशकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे मौल्यवान सागवान कापून त्याची वाहतूक करण्यात आली. एवढेच नाही तर वन्यप्राण्यांचीही तस्करी होत असल्याची कुजबुज सुरू आहे.
गेल्या आठवड्यात तेलंगणा राज्यातील वन कर्मचाऱ्यांनी धाडसी कारवाई करीत महाराष्ट्र राज्यातून आलेले सागवानाचे लठ्ठे पकडले. चौकशीत सदर सागवान लठ्ठे महाराष्ट्रातील जंगलातून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. उलट चुकांवर पांघरून घालून बाहेर माहिती जाणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.
तस्करांची हिंमत वाढलीच कशी?
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सिरोंचा वनविभागात सागवान तस्करीची अनेक प्रकरणे निदर्शनास आली आहेत. तरीही तस्करांची हिंमत कमी झालेली नाही. यामुळे त्यांच्याकडे काही कर्मचारी, अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात की विभागाची यंत्रणा अयशस्वी ठरत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. जंगलाच्या रक्षणासाठी व व्यवस्थापनासाठी आलेला निधी, खर्च झालेला निधी, जंगलातील बीटची तपासणी योग्य पद्धतीने केल्यास वनविभागाच्या कामातील सत्य स्थिती बाहेर येऊ शकेल.
तेलंगणाच्या वनाधिकाऱ्यांनी पकडलेले सागवान कुठले?
गेल्या १७ नोव्हेंबरला तेलंगणा राज्यातील वनअधिकारी-कर्मचारी महादेवपूर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या पंकेलापलमेला परिसरात गस्तीवर असताना मिनी मेटॅडोर वर तांदळाचे पोते आणि खाली मौल्यवान सागवानाची तस्करी सुरू असताना त्यांनी रंगेहाथ पकडले. यात अंदाजे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना ताब्यात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या सिरोंचा वनविभागांतर्गत जंगलातील ते सागवान लठ्ठे असल्याचे समोर आले; मात्र हे सागवान सिरोंचा वनविभागातील नसल्याचे उपवनसंरक्षकांनी म्हणत या प्रकरणातून अंग काढून घेतले. त्या सागवान तस्करीची योग्य चौकशी करून ते कुठून आले याचा शोध लावून तस्करीला आळा घालावा, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.