गडचिराेली : नागपंचमी या सणाच्या दिवशी नागाची प्रतिमा व मूर्तीची पूजा केली जाते. या सणाच्या माध्यमातून सापांविषयी असलेली सहानुभूती, श्रद्धा प्रदर्शित हाेते. मात्र, इतर दिवशी सापांना मारले जात असल्याचे विराेधाभासी चित्र दिसून येते.
साप दिसताच अंगावर काटे उभे राहतात. प्रत्येक प्रकारचा साप विषारी आहे, असा गैरसमज नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच साप दिसताच भीती निर्माण हाेते व घरातील काठ्या बाहेर काढल्या जातात. मात्र, गडचिराेली जिल्ह्यात आढळणाऱ्या एकूण सापांच्या प्रजातींपैकी केवळ चार प्रकारच्या प्रजाती विषारी आहेत. या चार प्रकारच्या प्रजातींमुळे इतर बिनविषारी सापांचा नाहक बळी जात असल्याचे दिसून येते.
नागरिकांमध्ये जागृती नसल्याने साप दिसला की विचार न करता त्यांना मारण्यासाठी स्पर्धा लागते. नागरिकांमध्ये याबाबत जागृती करण्याची गरज आहे. साप हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे इतर जीव व प्राण्यांसाेबतच सापाचेही रक्षण करणे आवश्यक आहे.
बाॅक्स....
साप हा शेतकऱ्याचा मित्र
शेतातील उंदीर, किडे हे सापाचे प्रमुख खाद्य आहे. किडे व उंदरांच्या माध्यमातून पिकाचे माेठे नुकसान हाेते. साप जर असेल तर हे नुकसान कमी हाेण्यास मदत हाेते. मात्र, विषारी काेणता व बिनविषारी साप काेणता, याची माहिती शेतकऱ्याला असणे आवश्यक आहे.
बाॅक्स...
सर्पमित्र काय म्हणतात....
गडचिराेली जिल्ह्यात केवळ चार प्रकारचेच साप विषारी आहेत. मात्र, सर्वच साप विषारी असल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये असल्याने साप दिसताच त्याला मारून टाकले जाते. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. साप दिसून आल्यास जवळच्या सर्पमित्रांना याची माहिती द्यावी.
- अजय कुकडकर, सर्पमित्र, गडचिराेली
बाॅक्स...
साप आढळला तर...
- घरी साप आढळल्यास तत्काळ सर्पमित्राला फाेन करून बाेलवावे.
- सर्पमित्रामार्फत सापाला पकडून त्याला मानववस्तीच्या दूर नेऊन साेडावे.
- अप्रशिक्षित व्यक्तीने साप पकडण्याचा प्रयत्न करू नये, त्याला डिवचू नये.
बाॅक्स...
जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार
विषारी : नाग, घाेणस, फुरसे, मण्यार
बिनविषारी : धामण, नानेटी (वाश्या), दिवट (धाेंड्या), डुरक्या घाेणस (चिखल्या), कुकरी, गवत्या, रूका (वेल्या), कवळ्या, तस्कर, अजगर, मांडूळ (मालवन), चंचुवाडा (कान्हाेळा), धूळनागीण.
-