गडचिराेली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभूत किंमत खरेदी याेजनेंतर्गत जिल्ह्यात धानाची खरेदी सुरू आहे. महामंडळाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात एकूण ९० केंद्र मंजूर करण्यात आले. यापैकी ७७ केंद्रांवर धानाची आवक झाली असून आतापर्यंत एकूण ६५ काेटी ९१ लाख ४ हजार रुपये किमतीच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे. केंद्र सुरू झाल्यापासून १५ जानेवारीपर्यंत गडचिराेली व अहेरी परिसरातील ७७ केंद्रांवर एकूण ३ लाख ५२ हजार ८३९ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. महामंडळाच्या वतीने यावर्षी साधारण धानाला प्रती क्विंटल १८६८ रुपये भाव दिला जात आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिराेली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५१ केंद्र मंजूर करण्यात आले. सर्वच केंद्रांवर धानाची आवक झाली असून आतापर्यंत १० हजार ४५७ शेतकऱ्यांनी २ लाख ९४ हजार ८३३ क्विंटल धानाची विक्री केली आहे.
महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीमध्ये ३९ केंद्र मंजूर करण्यात आले. यापैकी २६ केंद्रांवर धानाची आवक झाली असून आतापर्यंत या केंद्रांवर १ हजार ७२८ शेतकऱ्यांनी ५८ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गडचिराेली परिसरातील ५१ केंद्रांवरून ५५ काेटी ७ लाख ४८ हजार रुपये तर अहेरी उपविभागात १० काेटी ८३ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या वतीने यावर्षीसुद्धा आधारभूत केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये इतका बाेनस देण्यात येणार आहे. धानाचा हमीभाव व बाेनसची रक्कम मिळून शेतकऱ्यांना चांगला माेबदला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा महामंडळाच्या आधारभूत केंद्रांवर धानाची विक्री करण्याचा कल वाढला आहे. गतवर्षीही महामंडळाच्या केंद्रांवर धानाची विक्रमी खरेदी झाली हाेती.
बाॅक्स
चुकारे मिळण्यास हाेतेय दिरंगाई
आदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्थेच्या वतीने धानाची खरेदी केली जात असून शेतकऱ्यांना थेट शासनाकडून चुकाऱ्याची रक्कम बँक खात्यात अदा केली जात आहे. मात्र ही रक्कम अदा करण्यासाठी बऱ्याच बाबींची पूर्तता व पडताळणी केली जाते. या प्रक्रियेत वेळ जात असल्यााने शेतकऱ्यांना धान विकूनही चुकाऱ्याची रक्कम लवकर मिळत नाही. गडचिराेली व अहेरी कार्यालय मिळून अजूनही २९ काेटी ९० लाख रुपयांचे चुकारे प्रलंबित आहे. परिणामी ५ हजार ४९० शेतकरी रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.