लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिराेली जिल्ह्यात लाेकांमध्ये वाघांची दहशत सुरू झाली. दिवसेंदिवस हा धाेका कमी हाेताना दिसत नाही. मागील वर्षी तर वाघांच्या हल्ल्यांनी मर्यादाच ओलांडली. यावर्षी सुद्धा आतापर्यंत पाच लाेकांचा बळी वाघाने घेतला. वाघांकडून पाळीव जनावरांवर हल्ले हाेतच आहेत. ह्या घटना ताज्या असतानाच जंगलालगत असलेली शेती कसताना पेरणीपूर्व मशागतीत वाघांचा धाेका सर्वाधिक आहे. वनविभागाने शेतकऱ्यांसाठी याेग्य उपाययाेजना न केल्यास वनालगतची शेती पडिक राहण्याची शक्यता आहे.गडचिराेली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून वाघ, बिबट तसेच अन्य हिंस्त्र प्राण्यांपासून मानवावर हल्ले हाेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. सुरुवातीला आरमाेरी व देसाईगंज तालुक्यात, त्यानंतर गडचिराेली तालुक्यात वाघांच्या हल्ल्यांनी कहरच केला. २७ जानेवारी २०१९ पासून १४ मे २०२२ पर्यंत एकूण ३० लाेकांचा बळी वाघ व बिबट्यांनी घेतला. २०२२ मध्ये २० जानेवारी राेजी आरमाेरी तालुक्यातील कुरंझा येथील इसमाला वाघाने ठार केले तर याच वर्षी १३ व १४ मे राेजी अरसाेडा व आरमाेरी येथील महिला व पुरुषाला वाघाने त्याच्याच शेतात ठार केले. उन्हाळ्यात जंगल शुष्क असतानाही वाघाने लपूनछपून हल्ले केले. आता तर वनराई बहरली आहे. पेरणीपूर्व मशागतीला सुरुवातही झाली आहे. अशास्थितीत शेतकरी शेतात भीती मनात ठेवूनच जात आहेत. त्यातही ज्या शेतकऱ्यांची शेती जंगलालगत आहे व त्याच परिसरात वाघाची दहशत आहे, अशा ठिकाणी जाण्यास शेतकरी धजावत नाही. मागील वर्षीसुद्धा बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी वाघाच्या दहशतीमुळे जंगलालगतची शेती पडिक ठेवली.
काेणकाेणत्या गावातील शेतकऱ्यांना धाेका?गडचिराेली व वडसा वनविभागातील शेतकऱ्यांना वाघाच्या हल्ल्याचा सर्वाधिक धाेका आहे.
- गडचिराेली तालुक्यातील जेप्रा-दिभना परिसरातील पाच गावे,धुंडेशिवणी परिसर चुरचुरा, कुऱ्हाडी, महादवाडी, गाेगाव तसेच टेंभा चांभार्डा, मरेगाव, अमिर्झा कळमटाेला, आंबेटाेला, आंबेशिवणी, राजगाटा- आरमाेरी तालुक्यातील सिर्सी, गणेशपूर, इंजेवारी, कुरंझा, देलाेडा, अरसाेडा तसेच कासवी परिसर देसाईगंज तालुक्यातील कुरूड, काेंढाळा, शिवराजपूर परिसर आदी गावांमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक धाेका आहे.
आतापर्यंत किती बळी? गडचिराेली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात वाघ-बिबट्यांनी आतापर्यंत ३० लाेकांचा बळी घेतला. वाघांनी २५ लाेकांना ठार केले तर बिबट्यांनी ५ लाेकांचा बळी घेतला. बिबट बळींमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एका लहान मुलांचाही समावेश आहे. चालू वर्षात एकूण ५ बळी वाघांनी घेतले. यामध्ये आरमाेरी तालुक्यातील तीन तर देसाईगंज तालुक्यातील दाेघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चार पुरूष व एक महिला ठार झाली.