- मनोज ताजने गडचिरोली : पूर्वी मुंबई-पुण्याकडे विदर्भातला माणूस आपल्या व-हाडी ठसक्यात बोलायला कचरत असे. चुकून तोंडातून एखादा शब्द व-हाडी निघाला तरी समोरची व्यक्ती त्यांना हिणवत असे. पण आता विदर्भाच्या व-हाडी भाषेने मुंबईसह महाराष्ट्रात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे कोणी व-हाडी ठसक्यात बोलताना न्युनगंड बाळगत नाही याचा आनंद वाटतो, असे मनोगत प्रसिद्ध विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कार्यक्रमासाठी गणेशपुरे सोमवारी गडचिरोलीत आले असताना लोकमतशी बोलत होते. मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेले गणेशपुरे यांनी आतापर्यंत ४० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांत, टीव्हीवरील अनेक मराठी मालिकांत आणि रिअॅलिटी शो मध्ये काम करताना मराठी प्रेक्षकांच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत विदर्भातच राहिले असल्यामुळे व-हाडी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. मुंबईत अभिनयक्षेत्र गाजवत असतानाही त्यांनी आपला व-हाडी बाणा सोडलेला नाही. अनेक टीव्ही शो किंवा विशेष कार्यक्रमांमध्ये व-हाडी भाषेचा वापर ते आवर्जून करताना दिसतात.बोलण्यात एखादा व-हाडी शब्दप्रयोग झाला तरी हिणवल्या जाणाऱ्या १५ वर्षांपूर्वीच्या काळात कॅमेरासमोर व-हाडीचा सर्रास वापर करण्याची हिंमत कशी केली, या प्रश्नावर गणेशपुरे म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीत कोल्हापुरी, सांगली-साता-याकडील वेगळा टोन सर्रास वापरला जात असताना विदर्भाची व-हाडी मात्र त्यांना माहीतच नव्हती. त्यामुळे मी जाणीवपूर्वक व-हाडीचा वापर करत आलो. विनोदी भूमिका साकारताना व-हाडीतून केलेले विनोद प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे व-हाडीचा वापर करताना पूर्वी अनेकांना वाटत असलेला न्युनगंड आता दूर झाला आहे. विदर्भातील मूळचे रहिवासी असलेले अनेक अधिकारी आता मुंबईत बोलताना व-हाडीचा वापर बिनदिक्कतपणे करत असल्याचे त्यांनीच आपल्याला सांगितले, असे गणेशपुरे म्हणाले.पूर्व विदर्भातल्या झाडीपट्टी रंगभूमीला कित्येक वर्षांची नाटकांची समृद्ध परंपरा आहे. आता तर मुंबई-पुण्यापर्यंत झाडीपट्टी रंगभूमीची ओळख झाली आहे. मला पण झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये काम करायला आवडेल, पण अलिकडे शेड्युल व्यस्त असते. त्यामुळे सलग तारखांमध्ये नाटकाचे बुकिंग असेल तर झाडीपट्टी रंगभूमीवर निश्चित काम करणार, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मुंबईत कितीही व्यस्त असलो तरी गावाची ओढ कमी होत नाही. सण-उत्सवाच्या काळात आवर्जुन पावलं गावाकडे वळतात. विशेषत: महालक्ष्मी पूजनासाठी दरवर्षी अमरावतीला येण्यासाठी माझे दिवस राखीव असतात, असेही गणेशपुरे यांनी सांगितले.
...म्हणून विदर्भातला माणूस मुंबईतही व-हाडी बोलू लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 7:13 PM