लाेकमत न्यूज नेटवर्क, गडचिराेली : काेराेना संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात आटाेक्यात आली असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एकूण २७२ गावांमध्ये केवळ १९० सक्रिय बाधित काेराेना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार, काेराेनामुक्त गावांमधील इयत्ता पाचवी ते आठवीचे शाळा सुरू करून प्रत्यक्ष वर्ग भरविण्यात येणार आहेत. त्यानुसार गडचिराेली जिल्ह्यातील काेराेनामुक्त १ हजार १०९ गावांमध्ये शाळा यंदाच्या शैक्षणिक सत्रात सुरू हाेण्याची शक्यता आहे.
गडचिराेली जिल्ह्यात एकूण १ हजार ८५८ शाळा आहेत. पाचवी ते आठवडी वर्गामध्ये अनुक्रमे १६ हजारच्या वर विद्यार्थी दाखल आहेत. काेराेनाचा प्रादुर्भाव पाहता काेराेनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ शकते. मात्र, विद्यार्थ्यांच्या आराेग्याशी आपण खेळू शकत नाही, हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या अर्थात काेराेनामुक्त ग्रामीण भागातील गावांमधील शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दुसरीकडे ज्या गावात काेराेनाचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी ऑनलाईन व डिजिटल पद्धतीने अप्रत्यक्षरीत्या शिक्षण पद्धती राबविण्यात येणार आहे.
काेट
राज्य शासनाच्या निर्णयानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात काेराेनाचा प्रादुर्भाव नसलेल्या गावांमधील प्राथमिक शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, याबाबतचे स्पष्ट आदेश प्राप्त झाले नाहीत. शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर काेराेनासंदर्भात संपूर्ण खबरदारी घेऊन पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येतील.
- हेमलता परसा, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. गडचिराेली.
बाॅक्स
ग्रामसमिती व शिक्षकांवर येणार जबाबदारी
शाळा सुरू करण्यासाठी यावर्षी सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयाेजित करण्यात येणार आहे. गावांमधील काेविड प्रतिबंधक समिती, तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. या चर्चेमधून शाळांमधील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची साेय आदी कामे पूर्ण करायची आहेत. गटागटाने पालक सभा घेऊन पालकांच्या मनातील काेराेनाची भीती कमी करण्यावर प्रशासन भर देणार आहे.