जमात प्रमाणपत्र पडताळणीस विलंब : माना आदिम जमात मंडळाचा इशारा गडचिरोली : येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती माना समाजाच्या नागरिक व विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणीचे दावे जाणूनबुजून प्रलंबित ठेवत आहे. यामुळे अनेक युवकांना आपली नोकरी गमवावी लागत आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती विरोधात माना आदिम जमात मंडळाच्या वतीने मे महिन्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पत्रकार परिषदेतून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. माना जमाती आदिवासी जमात असून स्वातंत्र्यपूर्व १८६९ मध्ये तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रथम सेटलमेंट रिपोर्टमध्ये मेजर लुसी स्मीथ यांनी माना आदिवासी जमातीची लोकसंख्या २९ हजार १७५ असल्याची नोंद केली आहे. त्यानंतर १९५६ साली माना जमातीची नोंद घटनेच्या ३४२ व्या कलमानुसार घेण्यात आली. माना जमातीला वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय ६ आॅक्टोबर २००६ व ७ आॅक्टोबर २००६ ला आदेश निर्गमित करून माना जमातीला जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे सर्वाेच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. मात्र गडचिरोली येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती राजकीय दबावात काम करीत आहे. २०११ पासून माना समाजाच्या नागरिकांचे प्रमाणपत्र पडताळणीचे दावे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा तसेच युवकांना नोकरीपासूनही वंचित राहावे लागत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही हणन होत आहे. त्यामुळे पडताळणी समितीच्या विरोधात मे महिन्यापासून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. गोंडवाना स्टुडंट युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी माना जमातीवर बोगस असल्याचा आरोप केला आहे. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर माना जमातीला सर्वोच्च न्यायालयाने वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गोंडवाना स्टुडंट युनियनला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तसेच माना समाजाच्या विरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. गोंडवाना स्टुडंट युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी माना समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा संघटनेचे सचिव वामन सावसाकडे यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला अध्यक्ष शत्रुघ्न चौधरी, अॅड. वामन नन्नावरे, मधुकर केदार, राजन हिरे, रमेश राणे, गोपाल मगरे, दीपक घोडमारे, भाऊराव घोडमारे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
पडताळणी समितीविरोधात माना समाज आंदोलन करणार
By admin | Published: March 12, 2017 1:57 AM