लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ४९ गावांमध्ये वीज पुरविणे शक्य नसल्याबाबत महावितरणने शिक्कामोर्तब केल्यानंतर या गावांमध्ये मेडाअंतर्गत सौरऊर्जेवर चालणारे साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला. १७ गावांमध्ये सौरऊर्जेचे साहित्य पुरविण्यात आले असून उर्वरित ३२ गावांमध्ये आकांक्षित जिल्हा अंतर्गत सौरऊर्जेचे साहित्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत.एटापल्ली, भामरागड व अहेरी तालुक्यातील काही गावे घनदाट जंगल, डोंगरदऱ्या व नद्यांनी वेढली आहेत. यातील ४९ गावांना वीज पुरवठा करणे शक्य नसल्याचे महावितरणने केलेल्या पाहणीदरम्यान दिसून आले. घर तिथे वीज पुरवठा देण्याचे शासनाचे धोरण आहे. या गावांना वीज पुरवठा करणे शक्य नसल्याने सौरऊर्जेची साधने पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. एप्रिल ते मे या कालावधीत ४९ गावांपैकी १७ गावांतील ५५२ कुटुंबांना सौरऊर्जेचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सौरऊर्जेच्या साहित्यामध्ये २४ वॅटचे सोलर पॅनल, ७५ एएचची बॅटरी, चॉर्ज कंट्रोलर, १२ वॅटचे चार एलईडी बल्ब, मोबाईल चॉर्जर सॉकेट यांचा समावेश आहे. दुर्गम भागातील गावे आहेत. त्याचबरोबर हे संयत्र कधीही बिघडू शकते. त्यामुळे पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संयत्र पुरविणाऱ्या कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. ४९ पैकी ३२ गावे सौरऊर्जेपासून वंचित राहली होती. जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड झाली आहे. याअंतर्गत सौभाग्य योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत उर्वरित ३२ गावांमध्ये सौरऊर्जेचे संयंत्र पुरविले जाणार आहेत. एक महिन्याच्या कालावधीत ४९ गावे सौरऊर्जेने प्रकाशित होतील, अशी आशा आहे.सौरऊर्जा सयंत्र लागलेली १७ गावेसौरऊर्जा सयंत्र लागलेल्या १७ गावांमध्ये एटापल्ली तालुक्यातील कुंजेरमार्का, हिद्दूर, कोयर्इंदवारसा, रेखाबटलटोला, रेंगटोला, जिजावंडीटोला, तोडगट्टा, भामरागड तालुक्यातील खोदेवाडा, मुसेनपुई, कावंडे, मेडापल्ली, फुंडीएम, मर्धुर, विसामुंडी, अहेरी तालुक्यातील कोंझेड, कोडसेपल्लीमसा, कल्लमएम या गावांचा समावेश आहे. या १७ गावांतील ५५२ कुटुंबांना सौरऊर्जा संयंत्र पुरविण्यात आले आहेत.कंत्राटदारावर विशेष नजर ठेवण्याची गरजप्रत्येक कुटुंबाला सौरऊर्जा संयंत्राची जी किट पुरविली जाते, ती जवळपास सात हजार रूपयांची आहे. निविदा काढताना पुढील पाच वर्ष संबंधित सयंत्राच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविली राहते. या पाच वर्षांत एखादे सयंत्र बिघडल्यास ते नवीन सुद्धा लावून द्यावे लागते. मात्र कंत्राटदार सयंत्र लावून बिल उचलल्यानंतर पसार होत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. दुर्गम भागातील नागरिक याबाबत तक्रारही करीत नाही. त्यामुळे कंत्राटदाराचे फावते व एक ते दोन महिन्यानंतरच गावात अंधार पसरतो. ही बाब घडू नये, यासाठी संबंधित कंत्राटदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
दुर्गम भागात सौरऊर्जेचा प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:07 AM
जिल्ह्यातील ४९ गावांमध्ये वीज पुरविणे शक्य नसल्याबाबत महावितरणने शिक्कामोर्तब केल्यानंतर या गावांमध्ये मेडाअंतर्गत सौरऊर्जेवर चालणारे साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला.
ठळक मुद्दे‘मेडा’अंतर्गत उपक्रम : १७ गावांमध्ये काम पूर्ण; ३२ गावे ‘सौभाग्य’ योजनेतून प्रकाशणार