वन विभागाचा पुढाकार : वीज नसलेल्या रेगडीगुट्टा गावात होणार प्रकाशाची सुविधा एटापल्ली : भामरागड वन विभागाअंतर्गत कसनसूर वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे वीज पुरवठ्याची सोय नसलेल्या रेगडीगुट्टा या गावातील अनुसूचित जमातीच्या २० कुटुंबांना सौरकंदील वितरित करण्यात आले. यामुळे रेगडीगुट्टा गावात प्रकाशाची सुविधा होणार आहे. तहसील कार्यालय एटापल्लीच्या वतीने बुधवारी कसनसूर वनपरिक्षेत्रातील वेनासूर येथे महाराजस्व अभियानांतर्गत मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे औचित्य साधून कसनसूर वनपरिक्षेत्रातर्फे वीज पुरवठा नसलेल्या रेगडीगुट्टा येथील २० कुटुंबांना सौरऊर्जेवरील दिवे वाटप करण्यात आले. यावेळी एटापल्लीचे नायब तहसीलदार मेश्राम, पं. स. च्या कृषी अधिकारी रामटेके, कसनसूरचे क्षेत्र सहायक पी. बी. मानापुरे, ग्रामसेवक बारापात्रे, वनरक्षक मेश्राम, सयाम, कसनसूरचे मंडळ अधिकारी बोधनवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय तसेच वन विभागातील कर्मचाऱ्यांनी तसेच तलाठ्यांनी सहकार्य केले. जिल्हा निर्मितीच्या ३४ वर्षानंतरही गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागाच्या अनेक दुर्गम गावांमध्ये वीज पोहोचली नाही. त्यामुळे अशा गावातील नागरिकांना केरोसीनच्या दिव्यावर अवलंबून राहावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन वन विभागाने तीन ते चार वर्षापूर्वीपासून सौरऊर्जेवरील दिवे कुटुंबांना देण्याची योजना कार्यान्वित केली. सदर योजना सर्व वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत राबविली जात आहे. त्यामुळे वीज नसलेल्या गावांमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून प्रकाशाची सुविधा झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
२० कुटुंबांना सौरकंदील वाटप
By admin | Published: March 25, 2017 2:27 AM