लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत तिमरम हद्दीतील निमलगुडम येथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 'जल जीवन मिशन' कार्यक्रमांतर्गत २०२२- २३ मध्ये सौरऊर्जेवर आधारित नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, मागील आठवड्यापासून सदर योजना बंद अवस्थेत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
निमलगुडम येथे गेल्या एक वर्षांपूर्वी सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ योजना कार्यान्वित केली होते. परंतु एक वर्षात तीन ते चार वेळा सदर नळ योजना बंद पडली. ही माहिती संबंधित कंत्राटी कामगारांना दिल्यानंतर दुरुस्ती करीत होते. मात्र, सद्या एका आठवड्यापासून पाणी पुरवठा बंद आहे. परिणामी भर पावसात येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
या नळ योजनेची देखभाल करण्याची जबाबदारी पाच वर्षांकरिता कंत्राटदाराची आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ग्रामीण भागातील सौरऊर्जा आधारित नळ योजनेला लावलेले यंत्र दर्जेदार नसल्यामुळेच सातत्याने त्यात बिघाड होत असावा, असा अंदाजही नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
निमलगुडम येथील सौरऊर्जा आधारित लघु नळ योजना बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी गावातील हातपंप किंवा विहिरीकडे धाव घ्यावी लागत आहे. करिता निमलगुडम येथील सौरऊर्जा आधारित लघु नळ योजना त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी आनंदराव कोडापे, नागेश शिरलावार, राकेश सोयाम, दिलीप मेश्राम, रैना सोयाम, वैशाली मेश्राम, राधाबाई कोडापे, रुंदा कोडापे, तनुश्री बामनकर, सुनीता कोडापे यांनी केली आहे.
देखभाल दुरुस्तीकडे यंत्रणेचा कानाडोळा सौरऊर्जेवरील पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.