बैठकीदरम्यान विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यासाठी जि.प. ला माहिती पाठविणे, वंचित विषय शिक्षकांची नावे यादीत समाविष्ट करावी, विषय शिक्षक यादीत असलेल्या चुका दुरुस्त कराव्या. मागील दोन वर्षांपासून थकीत असलेले सर्व शिक्षकांचे बिल तयार करून अनुदानाची मागणी करावी. खाजगी परीक्षेला बसलेल्या उर्वरीत शिक्षकांना परवानगी द्यावी, एप्रिलपासून दरमाह आयकर कपात करणाऱ्या शिक्षकांच्या रकमेच्या नोंदी वेळाेवेळी अद्ययावत ठेवाव्या. डी.सी.पी.एस.धारक शिक्षकांना कपातीची संपूर्ण माहिती द्यावी, गाेपनीय अहवाल द्यावा, यासह इतरही समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर गटशिक्षणाधीकारी नरेंद्र म्हस्के यांनी सर्व समस्या लवकर सोडविण्यात येतील,असे आश्वासन दिले. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, चामोर्शी तालुका सरचिटणीस मारोती वनकर, तालुका कार्याध्यक्ष सिद्धार्थ सोरते, तालुका युवा आघाडी अध्यक्ष सुजीत दास, संघटक दिलीप देवतळे, बजरंग शिनगारे, महेश सरकार, कमलाकर कोंडावार,मनोज दुधे, महादेव दुर्गे आदी उपस्थित होते.
बाॅक्स
शिक्षकांच्या प्रमुख मागण्या
जि.प.प्रशासनाकडून परत आलेले निवडश्रेणी व चटोपाध्यायचे प्रस्ताव त्रुटी दुरुस्त करून त्वरीत जि.प.ला पाठवावे, उर्वरीत शिक्षकांच्या स्थायी,नियमित,चटोपाध्याय व परीक्षा परवानगी संदर्भातील नोंदी सेवापुस्तकात घ्याव्या, मुख्याध्यापकांना शालेय प्रभार देताना नियमानुसारच देण्यात यावे,कुणावरही अन्याय होऊ नये, पटसंख्येनुसार अत्यावश्यक असणाऱ्या शाळेवर अतिरिक्त असणाऱ्या शिक्षकांची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करावी. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके द्यावी. मासिक पगारातील अशासकीय कपातीच्या नोंदी ठेऊन त्यांच्या डी.डी.दरमाह लवकरात लवकर संबंधित फर्मला पाठविण्यासाठी कार्यालयातील एका सहायकावर कायमस्वरुपी जबाबदारी सोपविणे, यासह प्रमुख मागण्या शिक्षकांनी चर्चेदरम्यान मांडल्या.