ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी : प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जि. प. शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक सेवा देत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित आहेत. प्रलंबित समस्या तत्काळ सोडवाव्या, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील शासन निर्णयातील जाचक अटी रद्द करणे, २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या प्राथमिक शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना सरसकट ४ हजार ३०० रूपये ग्रेड पे लागू करावे, मासिक वेतन दरमहा १ तारखेला अदा करावे, उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या स्पर्धा परीक्षेकरिता प्राथमिक शिक्षकांना पात्र ठरवावे, शालेय पोषण आहार, बांधकाम आदी अशैक्षणिक कामे मुख्याध्यापकांकडून काढून घ्यावे, विविध शैक्षणिक माहिती आॅनलाईन करण्याकरिता केंद्रस्तरावर सुसज्ज संगणक कक्ष उभारून संगणक तज्ज्ञ कर्मचारी नियुक्त करावे, जि. प. शाळेत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरित करावे, एमएससीआयटी संबंधित वसुली तत्काळ स्थगीत करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांना पटसंख्येची अट न ठेवता अंशकालीन निर्देश देण्यात यावे, विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता प्रतिदिन ५ रूपये देण्यात यावा, सर्व शाळांना मोफत वीज, पाणी सुविधा उपलब्ध करून द्यावी, जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची रिक्तपदे तत्काळ भरावी, वस्ती शाळा शिक्षकांना जुनी सेवा ग्राह्य धरण्यात यावी, जि. प. हायस्कूलमधील शिक्षकांचे वेतन नियमित द्यावे, अशी मागणी उपाध्यक्ष बापू मुनघाटे, प्रमोद खांडेकर, रघुनाथ भांडेकर यांनी केली.
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा
By admin | Published: June 18, 2017 1:28 AM