एटापल्ली तालुका : एसडीओ व तहसीलदारांना निवेदनएटापल्ली : शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागणीच्या पूर्ततेसाठी विदर्भ पटवारी संघ नागपूर तालुका शाखा एटापल्लीच्या वतीने गुरूवारपासून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्यस्थळी काळ्याफिती लावून आंदोलन केले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फतीने शासनाला निवेदन सादर करण्यात आले. दिलेल्या निवेदनात, तलाठी साजा व महसूल मंडळाची पुनर्रचना करणे, सातबारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी, सर्व्हरची स्पीड वाढवून देणे, सॉफ्टवेअरमधील अडचणी दूर करणे, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप, प्रिंटर पुरविणे तसेच त्यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसुली कामातून वगळणे, मंडळ अधिकाऱ्यांना कार्यालयीन भाडे मंजूर करणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसाठी ३ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत कर्मचारी काळ्याफिती लावून काम करणार आहेत. ७ ला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन, १० ला अतिरिक्त कार्यभार असलेल्या कार्यालयाच्या चाव्या तहसीलदार यांच्याकडे जमा करणे व त्याच दिवशी डीएससी परत करणे, १० ते १४ नोव्हेंबरपर्यंत पालकमंत्री, विरोधी पक्षनेते व आमदारांना आंदोलनाबाबत निवेदन सादर करणे, मागण्या मान्य न झाल्यास १६ नोव्हेंबरपासून राज्यातील तलाठी, मंडळ अधिकारी व अव्वल कारकून संवर्गातील मंडळ अधिकारी बेमुदत सामूहिक रजेवर जाणार आहेत, असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे. निवेदन नायब तहसीलदार रच्चावार यांनी स्वीकारले. निवेदन देताना तालुकाध्यक्ष संदीप जुनघरे, रमेश कन्नाके, व्ही. पी. बोधनवार, मंडळ अधिकारी बी. एस. गुरू, कन्नाके, पटवारी व मंडळ अधिकारी, अव्वल कारकून संवर्गातील कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
तलाठ्यांच्या समस्या मार्गी लावा
By admin | Published: November 05, 2016 2:34 AM