लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक व भौतिक सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मानव संसाधन विभागाचे सचिव बी. के. सिंग यांच्याकडे केली आहे. सिंग यांचे खासदार अशोक नेते यांनी भेट घेऊन नवोदय विद्यालयातील समस्यांवर चर्चा केली.१९८६ पासून चामोर्शी तालुक्यातील घोट येथे नवोदय विद्यालय सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्नच्या अतिशय कमी शाळा आहेत. त्यापैकी नवोदय विद्यालय आहे. जे पालक आपल्या पाल्यांचा खासगी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही, असे पालक नवोदय विद्यालयात आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतात. सहावी ते बारावीपर्यंत ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जवाहर नवोदय विद्यालयाला संरक्षण भिंत नाही. जंगलाला लागून इमारत असल्याने वन्यजीव व हिंस्त्र प्राण्यांपासून विद्यार्थ्यांना धोका आहे. त्यामुळे संरक्षण भिंत बांधावी, वन जमिनीची अडचण दूर करून शाळा इमारत, वसतिगृह, अतिथी गृह तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचे बांधकाम करावे. सर्व विषयांच्या शिक्षकांची नियुक्ती करावी. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करून मोफत शिक्षण द्यावे. पाण्यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना बांधावी. सर्व वर्गखोल्या डिजिटल कराव्या. अकरावी व बारावीसाठी ह्युमिनिटी आर्टस हा विषय सुरू करावा, अशी मागणी चर्चेदरम्यान केली.या सर्व समस्या सोडविण्यासाठी मानव संसाधन विभागामार्फत प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन या विभागचे सचिव बी. के. सिंग यांनी खासदारांना दिले.
नवोदय विद्यालयातील समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:07 AM
घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक व भौतिक सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मानव संसाधन विभागाचे सचिव बी. के. सिंग यांच्याकडे केली आहे. सिंग यांचे खासदार अशोक नेते यांनी भेट घेऊन नवोदय विद्यालयातील समस्यांवर चर्चा केली.
ठळक मुद्देसुविधा पुरवा : मानव संसाधन विभागाच्या सचिवांशी खासदारांची चर्चा