मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातल्या सहा प्रादेशिक विभागांपैकी चार विभागात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जलसाठ्याची स्थिती बरी असली तरी विदर्भवासीयांचा घसा आताच कोरडा पडत आहे. त्यात पश्चिम विदर्भातल्या (वऱ्हाड) पाच जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे या विभागात उन्हाच्या तीव्र झळा सहन करत पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.आजच्या स्थितीत राज्यातील मोठ्या, मध्यम व लघुप्रकल्पांमिळून सरासरी उपयुक्त जलसाठा ४१.९२ टक्के आहे. गेल्यावर्षी याच तारखेला राज्यात ३५.२३ टक्के जलसाठा होता. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा काहीशी बरी स्थिती दिसत असली तरी विदर्भात मात्र हे चित्र उलट आहे. विदर्भातील नागपूर विभागात गेल्यावर्षी २०.८१ टक्के जलसाठा होता, तो यावर्षी १९.९१ टक्के आहे. अमरावती विभागात गेल्यावर्षी ३२.२५ टक्के जलसाठा होता तो आता अवघा २१.३१ टक्के आहे. त्यामुळे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात विदर्भात पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ही स्थिती सर्वांचीच चिंता वाढविणारी आहे.उन्हाळ्यात मोठ्या प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्यासोबतच उन्हाळी पिकांचेही नियोजन केले जाते. पण पिण्यासाठीच पाणी नाही तर पिकांना कुठून देणार? अशी स्थिती आहे. विदर्भात मोठ्या प्रकल्पांपैकी बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, गडचिरोली जिल्ह्यातील दिना, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ही जलाशये कोरडी झाली असून त्यात शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. काही दिवसात इतर जलाशये रिकामी होतील.
७ मोठ्या प्रकल्पात १० टक्केपेक्षा कमी साठाअकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प (९.१९ टक्के), बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा (० टक्के), यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती (८.८४ टक्के), इसापूर (३.९३ टक्के), नागपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द (१०.०३ टक्के), गडचिरोली जिल्ह्यातील दिना (० टक्के) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा (० टक्के) या ७ जलाशयांमध्ये १० टक्केपेक्षा कमी जलसाठा आहे.