बेपत्ता दोघांचा सुगावा नाही : महसूल, पोलीस यंत्रणा कामाला देसाईगंज : ब्रह्मपुरी तालुक्याच्या जुनी लाडज येथून देसाईगंजकडे वैनगंगा नदीतून नावेने येत असताना नाव उलटून १२ प्रवाशी वाहून गेले होते. त्यापैकी १० जणांना बचाविण्यात मंगळवारी पथकाला यश आले. मात्र माधव देवाजी मैंद (४०) व सचिन शंकर चनेकार (२०) यांचा शोध लागला नाही. त्यांना शोधण्यासाठी बुधवारी दिवसभर देसाईगंज महसूल व पोलीस प्रशासनाने शोधमोहीम सावंगी परिसरात राबविली. देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, तहसीलदार अजय चरडे, पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात दोघांना शोधण्यासाठी शोधमोहीम सूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंत राबविण्यात आली. मात्र या दोघांचाही तपास लागला नाही, अशी माहिती देसाईगंजचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान या घटनेत नावेचा चालक पांडुरंग तुळशिराम मारबते रा. लाडज ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर याच्या विरूद्ध भादंविच्या १८०, १८२, ३३७ अन्वये गुन्हा देसाईगंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. मंगळवारी आ. क्रिष्णा गजबे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवने यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत शोधमोहीम आरंभ करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी सावंगी नदीघाटापासून आमगाव, विर्सी, जुनी वडसा, कुरूड, कोंढाळापर्यंचा भाग पिंजून काढण्यात आला. परंतु बेपत्ता झालेल्या दोघांचाही शोध लागला नाही. त्यानंतर बुधवारी पुन्हा शोधमोहिमेला प्रारंभ करण्यात आला. परंतु आजही यश आले नाही. मोटारसायकलने केला घात, चिमुकला मात्र बचावला लाडजवरून १२ प्रवाशी व एक मोटार सायकल घेऊन नावाडी पांडुरंग मारबते वैनगंगेला पूर असतानाही निघाले होते. या नावेत एक दुचाकी मोटारसायकल ठेवण्यात आली होती. त्या मोटारसायकलचा एका बाजुला तोल गेल्याने नाव हेलकावे खात बुडाली. १२ प्रवाशी तरंगायला लागले. सहा वर्षीय नयन शिवनाथ बनकर हाही आपली आई सुरेखा बनकरसोबत तरंगायला लागला. तीने नयनला व भाजीपाल्याच्या थैलीवर बसून पुरातून काढत जवळच्या नदीपात्राच्या लगतच्या बाभळीच्या झाडाला अडकविले. तेथे शेतकऱ्यांनी त्याचे रडणे ऐकून त्याला आपल्या ताब्यात घेऊन वाचविले.
सावंगी नदीघाटावर दिवसभर चालली शोधमोहीम
By admin | Published: July 14, 2016 1:10 AM