घनश्याम मशाखेत्री
धानाेरा : सुमारे दीड काेटी रुपये खर्चून धानाेरा येथे प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत १३ ऑगस्ट २०१९ राेजी बांडिया नदीच्या पुराचे पाणी शिरले हाेते. त्यामुळे इमारतीमधील वीज उपकरणांचे नुकसान झाले. तेव्हापासून या ठिकाणचा वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
युवकांना व्यवसायाचे प्रशिक्षण देता यावे यासाठी प्रत्येक तालुक्यात आयटीआयची निर्मिती करण्यात आली आहे. सुरुवातीच्या कालावधीत येथील आयटीआय भाड्याच्या खाेलीत भरविली जात हाेती. कालांतराने गडचिराेली मार्गावर राधेश्यामबाबा मंदिराजवळ सर्व सुविधांनी युक्त प्रशस्त इमारत बांधण्यात आली. सन २०११ पासून या ठिकाणी प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात झाली. इलेक्ट्राॅनिक्स, पेंटर, प्लंबर, डिझेल मेकॅनिक, कटिंग, ड्रेस मेकिंग हे सहा ट्रेड शिकविले जातात. वसतिगृहात २५ प्रशिक्षणार्थ्यांच्या राहण्याची साेय आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना १३ ऑगस्ट २०१९ रोजी बांडिया नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरले. या पाण्यामुळे आयटीआयचा रस्ता, बाहेर उभे असलेले प्रशिक्षणाचे वाहन, सुरक्षा भिंत, पथदिव्यांचे खांब, शासकीय दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच विद्युतचे फिटिंग पूर्ण जळले. वीजमीटर बोर्ड खराब झाले. तेव्हापासून येथील वीज आजतागायत दीड वर्ष लोटूनही बंद आहे. कोरोनाकाळात प्रशिक्षण बंद होते. १ जानेवारीपासून प्रशिक्षण सुरू झाले आहे; परंतु वीज नसल्याने वर्कशॉप बंद आहेत. त्यांच्या कृतियुक्त शिक्षणाला आळा बसत आहे. वर्गात शिकविताना विद्यार्थी व शिक्षकांना त्रास होत आहे. वीज उपकरणांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.
बाॅक्स
उन्हाळ्यात प्रशिक्षण घेणे हाेणार कठीण
आयटीआयचे प्रशिक्षण उन्हाळ्यातही सुरू राहते. मात्र वीजपुरवठा बंद असल्याने या ठिकाणी राहणे कठीण हाेणार आहे. तसेच वसतिगृहातही वीज नसल्याने विद्यार्थ्यांना तेथे राहता येत नाही. त्यामुळे त्यांना धानोरा येथे भाड्याची खाेली करून राहावे लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे.
काेट
आयटीआयमधील विद्युत दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून डीपीसीकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. ते मंजूर होताच निविदा काढून दुरुस्तीचे काम केले जाईल.
- एल. सी. हेरोडे, अभियंता (इले.) बांधकाम विभाग, गडचिरोली
काेट
याबाबत बांधकाम विभाग गडचिरोली यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला आहे; परंतु अजूनही विद्युत दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्यांना व शिक्षकांना त्रास होत आहे.
- एस. एस चौधरी, प्रिन्सिपॉल, आयटीआय, धानोरा