१९९२ मध्ये निर्मिती : उद्यानातील हिरवळ नागरिकांना करते आकर्षितलोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : नगर परिषदेमार्फत देसाईगंज येथील हुतात्मा स्मारक उद्यानाची नियमितपणे देखभाल केली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी लहान बालकांना खेळण्यासाठी साहित्य ठेवण्यात आले आहेत. उन्हाळ्यातही हिरवेगार असलेले हुतात्मा स्मारक उद्यान देसाईगंजवासीयांचे लक्ष वेधून घेत आहे. शहरातील लहान बालक व आबाल वृद्धांसाठी मनशांतीचे ठिकाण बनले आहे.बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हुतात्मा स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्या तालुक्यातील ज्या स्वातंत्र्यवीरांनी भाग घेतला, तसेच जे शहीद झालेत त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे व त्यांचे कार्य पुढील पिढीला प्रेरणा द्यावे, या उद्देशाने स्मारक उभारण्यात आले. देसाईगंज येथेही स्मारक उभारण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देसाईगंज येथील स्वातंत्र्य सैनिक बाबुराव केशव थोरात यांनी सक्रीयपणे सहभाग घेतला होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देसाईगंज येथे शहीद स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकावर त्यांचे नाव कोरण्यात आले आहे. जेव्हा हे स्मारक बनले तेव्हा देसाईगंज तालुका अस्तित्वात नव्हता. १९९२ ला देसाईगंजला तालुक्याचा दर्जा मिळाला. त्यावेळी नगर पालिकेचे नगराध्यक्ष हिरालाल मोटवानी यांनी त्यांच्या सौंदर्यदृष्टीतून स्मारकस्थळाला नंदनवन बनविण्याचा चंग बांधला व तो पूर्णत्वासही नेला. तब्बल २५ वर्षांच्या कालखंडानंतरही उद्यानाचे सौैंदर्य कायम आहे. देसाईगंज-आरमोरी मार्गावर सदर उद्यान आहे. उन्हाळ्यातही या ठिकाणी हिरवळ पसरली राहत असल्याने शहरातील नागरिकांसाठी मनोरंजन व मनशांतीचे ठिकाण बनले आहे. तर लहान बालकांना खेळण्यासाठी साहित्य असल्याने त्यांचेही खेळणे, बागळणे सुरू राहते. या उद्यानावर नगर पालिकेचे नियंत्रण आहे. या उद्यानाची नियमितपणे देखभाल केली जाते. स्वच्छतेबाबत कटाक्षाने लक्ष पुरविले जाते. दिवसेंदिवस या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे.
हुतात्मा उद्यानाची विशेष देखभाल
By admin | Published: May 26, 2017 2:23 AM