खासदारांचे निर्देश : वीज विभागाचा घेतला आढावा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. जंगलव्याप्त गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणून भूमिगत केबल टाकण्यावर विशेष भर द्यावा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. गडचिरोली येथील सर्कीट हाऊसमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वीज विभागाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी खासदारांनी निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, अल्पसंख्यांक जिल्हा महामंत्री जावेद अली, वीज विभागाचे जिल्हा अधीक्ष अभियंता म्हस्के उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांना वीज विषयक सुविधा उपलब्ध करण्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला द्यावा. गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय भिन्न आहे. जंगलामुळे ओव्हरहेड वीज तारा असल्यास वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अधिक राहते. वीज विभागाने शहरात भूमिगत वीज पुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातही भूमिगत केबल टाकून वीज पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे, यापुढे होणारा नवीन वीज पुरवठा भूमिगत मार्गानेच देण्यात यावा. पावसाळ्यापूर्वी रोहित्रांची विशेष देखभाल घेऊन वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन खासदारांनी केले. वीज विभागाचा आढावा घेताना खा. अशोक नेते, सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आ. डॉ. देवराव होळी.
वीज पुरवठ्यासाठी भूमिगत केबलवर विशेष भर द्या
By admin | Published: July 15, 2017 2:03 AM