तेंदू लिलाव प्रक्रिया : गतवर्षीपेक्षा यंदा भाव वधारला झिंगानूर/सिरोंचा : झिंगानूर ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या तेंदू युनिट झिंगानूर १, २, ३, येडसिल, वडदेली, मंगीगुडम, पुल्लीगुडम या सात गावांच्या तेंदूपत्ता गोणीचा लिलाव १८५६ दरावर गेल्याने या ग्राम सभांना २ कोटी १ लक्ष रूपये मिळाले आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा जास्त भाव आला आहे. १० एप्रिल रोजी झिंगानूर ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या झिंगानूर (माल), झिंगानूर चेक नं. १, झिंगानूर चेक नं. २, वडदेली, येडसिल, मंगीगुडम, पुल्लीगुडम येथे जाहीर लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण चार कंत्राटदार तेथे हजर झाले. त्यानंतर लिलाव बोलीची मूळ किंमत १४ हजार प्रति गोणी ठरविल्याप्रमाणे सदर कंत्राटदारांनी सदर किंमत मान्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली व गोणीची मूळ किंमत प्रति गोणी न घेता पूर्ण जंगलाची मूळ किंमत एक करोडपासून सुरू करण्यात यावी, असे ठरविण्यात आले व त्यानंतर बोली बोलण्यास सुरुवात झाली. उपस्थित कंत्राटदारांपैकी परवीन ट्रेडर्स (परवीन सुलताना) यांनी सर्वाधिक दोन कोटी एक लक्ष रूपयांची बोली लावली व सर्व सहमतीने सदर तेंदू लिलाव परवीन ट्रेडर्स यांना देण्यात आला. याप्रसंगी ग्रामकोष समितीचे सदस्य, सचिव, अध्यक्ष उपस्थित होते. तसेच सरपंच कोरेजी येल्ला मडावी, उपसरपंच शंकर मासा मडावी, रामचंद्र कुमरी, पेसा समन्वयक कडुकर, ग्रामसेवक परचाके, गावातील १०६ नागरिक उपस्थित होते. मागील वर्षापेक्षा चार हजारांवर अधिक भाव यंदा मिळाला आहे. त्यामुळे या भागातील तेंदू मजुरांमध्ये उत्साह असून उत्पादनातून बोनस स्वरूपात रक्कम वितरित केल्यावर उर्वरित पैसा परिसरातील गावांच्या विकास कामासाठी खर्च करण्यात येईल, असे सरपंच कारेजी मडावी यांनी सांगितले. (वार्ताहर)
दोन कोटी एक लक्ष रूपयांची लागली झिंगानुरात बोली
By admin | Published: April 13, 2017 2:40 AM